Published On : Mon, Feb 7th, 2022
By Nagpur Today Nagpur News

लतादीदींनी अलौकिक स्वरांमधून देशाची अखंडता जपली – डॉ. नितीन राऊत

लता मंगेशकर रुग्णालयातील शोकसभेत लतादीदींना भावपूर्ण श्रद्धांजली

नागपूर: काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत विविध जाती, धर्म, भाषा, प्रांत, विचारधारा असलेल्या भारत देशाची अखंडता व एकात्मता जोपासण्याचे काम दिवंगत लता मंगेशकर यांनी आपल्या अलौकिक स्वरांच्या माध्यमातून केले. संविधानाला अपेक्षित असलेली धर्मनिरपेक्षता त्यांनी खऱ्या अर्थाने जोपासली, अशा शब्दात ऊर्जा मंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी लतादीदींना श्रद्धांजली वाहिली.

Gold Rate
24 Oct 2025
Gold 24 KT ₹ 1,23,400 /-
Gold 22 KT ₹ 1,14,800 /-
Silver/Kg ₹ 1,51,600/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

विद्या शिक्षण प्रसारक मंडळाच्या उच्च शिक्षण संस्थेच्यावतीने लता मंगेशकर वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या सभागृहात आयोजित श्रद्धांजली सभेत पालकमंत्री बोलत होते. या सभेला माजी मंत्री रणजित देशमुख, दत्ता मेघे वैद्यकीय विज्ञान अभिमत विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. वेदप्रकाश मिश्रा, माजी आमदार डॉ. आशिष देशमुख, वैद्यकीय शिक्षण संस्थेच्या अधिष्ठाता डॉ. काजल मित्रा, डॉ. उषा रडके आदी उपस्थित होते. याप्रसंगी लतादीदींच्या प्रतिमेला पुष्पचक्र अर्पण करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. 32 वर्षापूर्वी लतादीदींवरील प्रेमामुळे या वैद्यकीय महाविद्यालयाला त्यांचे नाव त्यांच्या संमतीने देण्यात आले होते. त्यामुळे अत्यंत भारावलेल्या वातावरणात आज मातोश्री सभागृहात श्रद्धांजली सभा घेण्यात आली.

डॉ. राऊत म्हणाले, लता मंगेशकर यांच्या निधनाने केवळ मराठी माणूसच नव्हे तर संपूर्ण भारत देश आणि दक्षिण आशिया खंडातील लोक शोकसागरात बुडाले आहे. भारतीय संगीतात “सा,रे, ग,म,प,ध,नी” हे सात मूळ सूर मानले जातात. संगीतातील जाणकारांनी तर ‘लतामंगेशकर’ हे सात अक्षरी नाव म्हणजे जणू संगीतातील सात सूर आहेत, अशा शब्दात लतादीदींच्या स्वरांचा गौरव केलेला आहे.

वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षी 1942 साली पहिल्यांदा ‘किती हसाल’ या मराठी चित्रपटासाठी गीत गाणा-या लतादीदींनी मृत्यूच्या 4 महिन्यांपूर्वी संगीतकार विशाल भारव्दाज यांनी गुलजार यांचे ‘ठीक नही लगता’ हे गीत स्वरबद्ध केले. मानवी जीवनात जितक्या भावना आहेत, त्या सर्व भावना लता मंगेशकर यांच्या सुरेल स्वरांनी व्यक्त झाल्या आहेत.

ते म्हणाले, आपण सकाळी उठतो तेव्हा लतादीदींचे स्वर कानी पडतात. ‘घनश्याम सुंदरा, श्रीधरा अरूणोदय झाला’ ही भुपाळी म्हणत हे सूर आपली सकाळ प्रसन्न करतात. त्यानंतर दिवसभर विविध घटनांना वा भावनांना साजेसे गीत गात हे सूर आपल्या सोबत असतात. सूर्याचे तेज कितीही असो संध्याकाळ झाली की सूर्य मावळतो, मात्र लतादीदींचे सूर कधीही अस्ताला जात नाहीत. सूर्य मावळल्यावर रात्र होते, तेव्हाही त्यांचे सूर ‘रात का समां, झुमे चंद्रमा’ म्हणत आपल्याला साद घालू लागतात.

दिवाळी असो की होळी, लतादीदींचे स्वर आपल्या सोबत असतात. ‘कैसे खुशी लेके आया चांद ईद का’ या सुरांनी आशिया खंडातील मुस्लिमांच्या ईदच्या आनंदात भर घातली. ‘येशू नाम सबसे महान’ या गीताच्या माध्यमातून त्यांनी ख्रिस्ती बांधवांच्या भावनांची अभिव्यक्ती केली तर ‘नमो अरिहंतानम्, नमो सिद्धानम’ या नमोकार महामंत्राच्या स्वरांनी जगभर पसरलेल्या जैन धर्मियांना प्रेरणा दिली. संविधानात अपेक्षित असलेली धर्मनिरपेक्षता लतादीदींनी आपल्या सुरांमधून जोपासली असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. राऊत म्हणाले, संत ज्ञानेश्वर असो की संत तुकाराम, गदिमा, पी. सावळाराम यांच्यासोबतच नागपूरकर सुरेश भट व ग्रेस या दोन महान कवींच्या रचना त्यांनी आपल्या सुरांनी अजरामर केल्या. सुरेश भट आणि कवी ग्रेस यांच्या कवितांचे गायन केले. थोर लेखक राम शेवाळकर यांच्याशी त्यांचे कौटुंबिक नाते होते. नागपूर येथेच त्यांना राज्याचा सर्वोच्च ‘महाराष्ट्र भूषण’ हा पुरस्कार 1997 मध्ये विधानभवनाच्या प्रांगणात प्रदान करण्यात आला. सरदार अटलबहादूर सिंग यांच्या पुढाकाराने त्यांचा 19 नोव्हेंबर 1996 साली व्हीसीए मैदानावर नागरी सत्कारही झाला. नागपूरचा पालकमंत्री या नात्याने या स्मृतींना उजाळा देताना मला अभिमान वाटत असल्याचे त्यांनी म्हटले.

माजी मंत्री व बीसीसीआयचे अध्यक्ष दिवंगत एन.के.पी. साळवे यांच्याशी त्यांचे भावासारखे नाते होते. साळवे यांच्या विनंतीवरून 1983 साली विश्वचषक जिंकणा-या भारतीय क्रिकेट चमूला बक्षीस देण्यासाठी त्यांनी दिल्लीत गाण्याचा कार्यक्रम आखून 20 लाखांचा निधी गोळा केला होता. माजी महापौर कुंदाताई विजयकरांशी त्यांचे घरोब्याचे संबंध होते. त्यांच्यासोबत बर्डीवर जाऊन साड्यांची खरेदी केल्याच्या गोड आठवणी नागपूरकरांच्या मनात आजही आहेत. रणजितबाबू देशमुख यांनी 32 वर्षांपूर्वी नागपुरात सुरू केलेले ‘लता मंगेशकर हॉस्पिटल’ लतादीदींच्या नावाने सुरू झालेले हे जगातील पहिले रूग्णालय असल्याचे सांगून डॉ. राऊत यांनी लतादीदींच्या स्मृतींना उजाळा दिला.

यावेळी माजी मंत्री रणजितबाबू देशमुख यांनीही लतादीदीच्या आठवणींना उजाळा दिला. तर दत्ता मेघे वैद्यकीय विज्ञान अभिमत विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनीही संबोधित केले. डॉ. ऐश्वर्या यांनी ‘ए मेरे वतन के लोगो’ गीत गाऊन लतादीदींना स्वरांजली वाहिली. श्रद्धांजली सभेचे संचलन श्वेता शेलगावकर यांनी केले.

Advertisement
Advertisement