Published On : Wed, Oct 11th, 2017

रेल्वेतील अटेंडंटच्या मदतीने लॅपटॉपची तस्करी

Advertisement

Yashwantpur to Danapur Express
नागपूर: लॅपटॉप व प्रोजेक्टरची अवैधपणे वाहतूक करणाºया रेल्वे गाडीतील अटेंडन्टला आरपीएफ गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले. पहिल्यांदाच अशी कारवाई करुन या गोरखधंद्याच्या भंडाफोड केला. ही कारवाई २२३१५ यशवंतपूर-दाणापूर एक्स्प्रेसमध्ये आज मंगळवारी सकाळी धावत्या रेल्वेत करण्यात आली. अटेंडन्टच्या ताब्यातून तीन बॅगमधील १४ लॅपटॉप व ४ प्रोजेक्टर असा एकूण ४ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. कारवाईनंतर संपूर्ण मुद्देमाल कस्टम विभागाच्या स्वाधीन करण्यात आला.

सुशिलकुमार अमरेंद्र नारायण (४०, रा. जयप्रकाशनगर, पाटणा) असे अटकेतील अटेंडन्टचे नाव आहे. तो यशवंतपूर- दाणापूर एक्स्प्रेसच्या बी-४ (एसी) बोगीत कर्तव्यावर होता. चार लाखांचे हे साहित्य त्याने चेन्नईहून दिनेश नावाच्या व्यक्तीजवळून घेतले आणि पाटण्याला पोहोचविणार होता. प्रति बॅग हजार रुपये या प्रमाणे त्याला तीन बॅगचे ३ हजार रुपये मिळणार होते. संपूर्ण मुद्देमाल विदेशी असून कुठल्याही प्रकारची कागदपत्रे नाहीत. अटेंडन्ट असल्याने तो नियोजितस्थळी सहज मुद्देमाल पोहोचवू शकतो. यामुळेच त्याच्यावर उपरोक्त जबाबदारी सोपविण्यात आली.

आरपीएफ गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक अरुण ठवरे, एएसआय संजय पुरकाम, विजय पाटील, किशोर चौधरी आणि डी. डी. वानखेडे हे नेहमीप्रमाणे कर्तव्यावर होते. सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास नागपूर रेल्वे स्थानकावर गाडी आली असता पथकाने गाडीची झाडाझडती सुरू केली. एस -४ बोगीत बेडशीट ठेवण्याच्या जागी तीन बॅग आढळल्या. पथकाने या बॅगविषयी विचारपूस केली असता त्याने समाधानकार उत्तर दिले नाही. बॅगसह अटेंडन्टला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता उपरोक्त माहिती त्याने पथकाला दिली. कारवाईनंतर संपूर्ण मुद्देमाल कस्टम विभागाच्या सुपूर्द करण्यात आला. ही कारवाई मध्य रेल्वेचे वरिष्ठ सुरक्षा आयुक्त ज्योतीकुमार सतीजा यांच्या मार्गदर्शनात व निरीक्षक भगवान इप्पर यांच्या नेतृत्वात करण्यात आली.