Published On : Tue, Aug 21st, 2018

माळशेज घाटात कोसळली दरड; वाहतूक ठप्प

Advertisement

माळशेज घाटात मंगळवारी पहाटे दरड कोसळल्याची घटना घडली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून दोन्ही मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली असून सध्या दरड हटवण्याचे काम सुरू आहे. परंतु, घाटात धुकं आणि पाऊस असल्याने या कामात अडथळे येत असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील यांनी दिली आहे.

माळशेज घाटात पहाटेच्या सुमारास बोगद्याजवळ दरड कोसळली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही परंतु, ट्रकवर दरड कोसळल्याने ट्रकचालक अमोल दहिफळे गंभीर जखमी झालाय. त्याच्यावर सध्या माऊली रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर आहे.

माळशेज घाटातील पावसामुळे रस्त्यावर दगड, मातीचा खच साचला असून तो हटवण्याचे कामही सध्या युद्धपातळीवर होत आहे. परंतु, दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाल्याने घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. महामार्ग अधिकारी कर्मचारी तसेच महसूल कर्मचारी आणि पोलीस हे घटनास्थळी पोहोचले आहेत.