Published On : Mon, Oct 8th, 2018

नारायण राणेंच्या फार्म हाऊसची भिंत जमीनदोस्त, भूसंपादन विभागाने जेसीबी फिरवला

Advertisement

पनवेल : मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणासाठी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या मालकीच्या निलेश फार्मवर भूसंपदा विभागाने अखेर कारवाई केली. या कारवाईत महामार्गाच्या रुंदीकरणात अडथळा ठरणाऱ्या भिंतीवर अखेर जेसीबी फिरविण्यात आला. प्रशासनाकडून जेसीबीच्या सहाय्याने ही भिंत पाडण्यात आली आहे.

राणेंच्या मालकीच्या या फार्म हाऊसवरील कारवाईला सोमवार सकाळपासूनच सुरूवात करण्यात आली. मुंबई-गोवा महामार्गावर तारा गावाच्या हद्दीत नारायण राणे व नीलम राणे यांच्या मालकीचे फार्म हाऊस आहे. या फार्म हाऊसची एकूण जागा अनुक्रमे 890 आणि 1320 चौरस मीटर एवढी आहे.

तर महामार्गाच्या रुंदीकरणात हा फार्म हाऊस जात असल्याने जागेचा मोबदला म्हणून राणे यांना प्रत्येकी 83 लाख आणि 43 लाख रुपये याप्रमाणे एकूण 1 कोटी 36 लाख रुपये देण्यात आले होते. मोबदला देऊनही अनेक वर्षे जागा ताब्यात न घेतल्याने भूसंपादन विभागाच्या कारभाराबाबत स्थानिकांमध्ये नाराजी होती. विशेष म्हणजे दैनिक लोकमतने याबाबत सविस्तर वृत्तही प्रकाशित केले होते. त्यानंतर, अखेर आज प्रशासनाकडून राणेंच्या मालकीच्या या जागेवर जेसीबी फिरविण्यात आला.