नागपूर : लकडगंज पोलिसांनी गस्ती दरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई करत दोन जिवंत व्यावसायिक डेटोनेटर आणि सुमारे १२ मीटर लीड गेज वायर जप्त केली आहे. या प्रकरणी राजेंद्र रामलाल विश्वकर्मा (वय ३५, रा. छत्तीसगड) याला अटक करण्यात आली आहे.
१ सप्टेंबर रोजी गस्तीवर असलेल्या पोलिसांना संशयित व्यक्तीबाबत गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी राजेंद्र विश्वकर्मा याची चौकशी केली असता त्याच्याकडून दोन जिवंत व्यावसायिक डेटोनेटर आणि अंदाजे १२ मीटर लीड गेज वायर आढळून आली. पोलिसांनी हा मुद्देमाल ताब्यात घेतला.
याप्रकरणी लकडगंज पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४९५/२०२६ अन्वये संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेल्या स्फोटक साहित्याची तज्ज्ञांकडून तपासणी करण्यात आली. हे साहित्य धोकादायक स्वरूपाचे असल्याचे तपासणीत निष्पन्न झाले.

डेटोनेटर नेमके कुठून आणले?
आरोपीने हे डेटोनेटर चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथील कोळसा खाणीतून मिळाल्याचे पोलिसांना सांगितले आहे. त्यामुळे पोलिसांचे पथक संबंधित ठिकाणी जाऊन माहितीची शहानिशा करणार आहे. डेटोनेटर मिळवण्यामागचा उद्देश काय होता, त्याला हे साहित्य कोणी दिले आणि या प्रकरणात आणखी कोणी सहभागी आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
दरम्यान, जप्त केलेले स्फोटक साहित्य नष्ट करण्यासाठी पोलिसांनी न्यायालयाकडे परवानगी मागितली होती. न्यायालयाने त्यास मंजुरी दिली आहे. त्यानुसार बॉम्ब शोधक व नाशक पथक तसेच कोलटेक कंपनीच्या सहकार्याने स्फोटक साहित्य सुरक्षितरीत्या नष्ट करण्याची कार्यवाही प्रस्तावित करण्यात आली आहे.




