Published On : Mon, Jul 16th, 2018

बोगस मजूरांच्या नावे लाखो रुपयांची उचल

कन्हान : – शहरात खाजगी कंत्राट कंपनीमार्फत करण्यात येत असलेल्या शहर स्वच्छता कामात वास्तविकतेपेक्षा जास्त मजुर दाखवून मोठी आर्थिक लुट करण्यात येत असल्याचे उघडकीस आले आहे. पाच जुलै रोजीच्या पावसात हा प्रकार सामाजिक कार्यकर्ते प्रशांत मसार यांनी स्वच्छता सभापती व विरोधी पक्षनेत्याच्या उपस्थित उघड केल्याने मोठी खळबळ माजली आहे. या प्रकरणी कंत्राटदार व अभय देणा-या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

याबाबत वृत्त असे की, पाच जुलैच्या रात्रीपासुन होत असलेल्या मुसळधार पावसाचे पाणी प्रभाग क्र एक, दोन, तीन व चार प्रभागामध्ये सांडपाण्याची निकासी व्यवस्था बरोबर नसल्याने तसेच कचरा उचलण्याचे काम होत नसल्याने नागरिकांना शारिरीक व मानसिक मनस्ताप सहन करावा लागत आहे. ह्या मुसळधार पावसामुळे पिण्याच्या पाईप लाईन मध्ये पाणी शिरून हे दुषित पाणी पिल्याने अनेक नागरिकांना संसर्गजन्य रोगाची लागण झाली आहे.

नागरिकांना होणाऱ्या त्रास व त्यांच्या तक्रारीवर सामाजिक कार्यकर्ते प्रशांत मसार, आरोग्य व स्वच्छता विभाग सभापती गेंदलाल काठोके, विरोधी पक्षनेते नरेश बर्वे यांनी स्वच्छता विभागा मध्ये विचारपूस केली असता प्रभाग नुसार साफसफाई करीता ३६ कर्मचारी यांचे द्वारे पाणी निकासी करण्यात येत असल्याचे कंत्राटदाराने सांगितले. वास्तविकता तपासण्यासाठी सुपरवायझर आशिष यादव व स्वच्छता विभागप्रमुख निरंजन बडेल याला सोबत घेऊन पाहणी केली असता केवळ १७ कर्मचारी काम करीत होते मात्र हजेरी मस्टरवर ३८ कर्मचार्‍यांचा सह्या होत्या. यासंदर्भात कंत्राटदारास विचारणा केली असता त्यांने कुठलेही समाधानकारक उत्तर दिले नाही.

विशेष म्हणजे गेल्या १८ महिन्यांपासून हा कत्रांटदार काम करीत आहे. निमानुसार जुन्या व नवीन करारामानुसार ( Agrement) कधीही काम केलेले नाही.अल्ट्रा क्लीन अॅन्ड केअर सर्विसेस मल्टीपरपज कंपनीला प्रती महिना नऊ लाख १८ हजार रुपये प्रमाणे २०१७-१८ मध्ये स्वच्छतेचे कंत्राट देण्यात आले. तर जुलै २०१८ पासून सहा लाख ९७ हजार रुपये प्रती माह प्रमाणे कंत्राट देण्यात आले आहे. स्वच्छतेसाठी वर्षभरात दिड करोड रुपये खर्च करण्यात येत असताना सुद्धा कन्हान शहरात स्वच्छता दिसून येत नाही.

पावसाळ्याच्या तोंडावर जागोजागी नाल्या तुंबल्या आहे. सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. हे चित्र शहरात सर्वत्र दिसत असताना सुद्धा लोकप्रतिनिधी कंत्राटदारावर आंधळा विश्वास कसा काय करीत आहे, हा नागरीकांमध्ये आता चर्चेचा विषय ठरला आहे. गेल्या १८ महिन्यात याच कत्रांटदाराने संपूर्ण शहरात करारनामा नुसार एकही काम केले नसून खोटी कामाची लिस्ट देऊन करोडो रुपयाची बिले उचलली आहे. कत्रांटदाराने नगरपरिषदची दिशाभूल करून मोठा आर्थिक गैरव्यवहार केला आहे.

त्यामुळे कन्हान शहराला स्वच्छता भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी “अल्ट्रा क्लीन एंड केयर सर्विसेस मल्टीपरज कंपनी” वर अफरातफरीचे गुन्हे दाखल करून काळ्या यादीत ( Blacklisted ) करण्यात यावे, अशा आशयाचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते प्रशांत मसार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नगरविकास मंत्री रणजीत पाटील, पालकमंत्री नागपुर चंद्रशेखर बावनकुळे, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांना दिले आहे. कंत्राटदारावर कार्यवाही न झाल्यास तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सुध्दा दिला आहे.