Advertisement

नागपूर : गणेशपेठ गार्डन परिसरातील कुक्रेजा आनंदम फेज-2 या बांधकाम प्रकल्पाच्या गोदामाला गुरुवारी दुपारी भीषण आग लागली. दुपारी 3.49 वाजता अग्निशमन विभागाला घटनेची माहिती मिळताच कॉटन मार्केट अग्निशमन केंद्राचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर इतर अग्निशमन पथकांच्या मदतीने सुमारे तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.
या आगीत गोदामातील इलेक्ट्रिक वायर, केबल, पाईप, नळ फिटिंग व इतर इलेक्ट्रिक साहित्य जळून खाक झाले. प्राथमिक माहितीनुसार, सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आगीचे नेमके कारण अद्याप समोर आले नसून ते अज्ञात असल्याचे अग्निशमन विभागाने सांगितले.
घटनेची नोंद गणेशपेठ पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, आग लागण्याचे कारण आणि नुकसानीचा तपशील याचा पुढील तपास सुरू आहे.




