Published On : Thu, Apr 22nd, 2021

कोविड 20:-तहसील प्रशासनाने केली नोडल ऑफिसरची नियुक्ती

कामठी :-कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोनाचा प्रकोप मोठ्या प्रमाणात असून खाजगी रुग्णालयात दाखल असलेल्या कोरोनाबधित रुग्णावर केलेल्या आरोग्य सेवेबाबत शासकीय दरापेक्षा अधिक किंमत रुग्णाच्या नातेवाईकांना मोजावी लागत असून याबाबत तक्रारी वाढीवर असल्याने खाजगी रुग्णालयातून कोरोनाबधित रुग्णांची होणारी आर्थिक लूट थांबविण्यासठी तहसीलदार अरविंद हिंगे यांनी नोडल ऑफिसरची नियुक्ती केली आहे.ही नियुक्ती तहसील प्रशासन आरोग्य विभाग तसेच रुग्णामध्ये महत्वाची भूमिका व अडचणी दूर करण्यासाठी व कार्य करण्यासाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून आता नियुक्त केलेल्या या नोडल अधिकाऱ्यांमुळे लोकप्रतिनिधी व जनतेचे अडचणी सोडवण्यास प्रशासनाला मदत होणार आहे. तसेच रुग्णाला चांगली सुविधा मिळवून संकटाचा सामना संयुक्तपणे लढण्यासाठी या निर्णयाने गती मिळणार आहे.

कामठी शहरात वाढत्या कोरोनाचा प्रकोप लक्षात घेता कोरोनाबधितांना रुग्ण सेवा मिळावी यासाठी कामठी येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात एक शासकीय कोविड केअर सेंटर असून खाजगी रुग्णालयातील कोविड केअर सेंटर रुग्णालयात सिटी हॉस्पिटल, लाईफ लाईन हॉस्पिटल, रॉय हॉस्पिटल, चौधरी हॉस्पिटल, आयुष्यमान हॉस्पिटल तसेच आशा हॉस्पिटल नेमण्यात आले आहेत या रुग्णालयातून कोरोनाबधित रुग्णाकडून शासकीय दरापेक्षा अधिक पैसे घेऊन रुग्णांची आर्थिक लूट होत असल्याची तक्रार सदर नोडल अधिकाऱ्याकडे प्राप्त होताच संबंधित रुग्णालयासाठी नेमण्यात आलेले नोडल अधिकारी हे रुग्णालयात कोविड विषयक देयकांचे पूर्वलेखापरिक्षण करणार आहेत.

यानुसार सदर खाजगी रुग्णालयासाठी नेमण्यात आलेले नोडल अधिकाऱ्यामध्ये सिटी हॉस्पिटल कामठी साठी कामठी नगर परिषद चे लेखा अधिकारी अमित खंडेलवाल, लाईफ लाईन हॉस्पिटल साठी कामठी नगर परिषद चे लेखा परीक्षक निर्वाण गायकवाड, रॉय हॉस्पिटल व चौधरी हॉस्पिटल साठी पंचायत समिती कामठी चे सहाय्यक लेखा अधिकारी खोत, तसेच आयुष्यमान हॉस्पिटल कामठी साठी कनिष्ठ लेखा अधिकारी उघडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

संदीप कांबळे कामठी