Published On : Thu, Jun 14th, 2018

कोरेगाव-भीमा हिंसाचारप्रकरण : सुधीर ढवळे सह चौघांना २१ जूनपर्यंत पोलीस कोठडी

पुणे : कोरेगाव -भीमा हिंसाचारपूर्वी एल्गार परिषदेत चिथावणी देणारी भाषणे दिल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेल्या चौघांच्या पोलिस कोठडीत २१ जूनपर्यंत वाढ करण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. तर अॅड. सुरेंद्र गडलिंग यांना सात दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. सुधीर प्रल्हाद ढवळे , रोना विल्सन,शोमा सेन आणि महेश सीताराम राऊत अशी पोलिस कोठडीत वाढ झालेल्या चौघांची नावे आहेत.

कोरेगाव-भीमा येथे पाच महिन्यांपूर्वी झालेल्या हिंसाचारप्रकरणी पोलिसांकडून मुंबई, नागपूर, दिल्लीत कारवाई करण्यात आली होती. कोरेगाव-भीमा हिंसाचारापूर्वी पुण्यात एल्गार परिषदेचे आयोजन करून हिंसाचारास चिथावणी दिल्याच्या आरोपावरून पुणे पोलिसांच्या पथकाने मुंबईतील गोवंडी भागातून ढवळे यांना अटक केली होती. त्या पाठोपाठ नागपूर येथून अ‍ॅड. सुरेंद्र गडलिंग, महेश राऊत आणि शोमा सेन यांना अटक करण्यात आली, तसेच दिल्लीतून रोनी विल्सन यांना अटक केली होती.

एल्गार परिषदेत करण्यात आलेले चिथावणी देणारे भाषण तसेच सादर करण्यात आलेल्या गीतांमुळे हिंसाचारास खतपाणी मिळाले. त्यामुळे ढवळे, अ‍ॅड. गडलिंग, राऊत, विल्सन, सेन यांच्या घरांवर दोन महिन्यांपूर्वी पुणे पोलिसांच्या पथकाने छापे टाकले होते. तेथून काही पुस्तके तसेच भित्तिपत्रके जप्त करण्यात आली होती. पुण्यातील कबीर कला मंचच्या कार्यकर्त्यांची चौकशी करण्यात आली होती.