Published On : Sun, Sep 22nd, 2019

कोराडी देवी मंदिर 24 ते 27 दर्शनासाठी बंद राहणार

नागपूर :श्री महालक्ष्मी जगदंबा देवी मंदिर कोराडी येत्या 24 ते 27 सप्टेंबरपर्यंत दर्शनासाठी बंद राहणार आहे. भाविकांना गाभार्‍यातून देवीचे दर्शन घेता येणार नाही. नवरात्र असल्यामुळे मंदिर आणि परिसराची स्वच्छता करण्यासाठी मंदिराच्या विश्वस्त मंडळाने हा निर्णय घेतला असल्याची माहिती संस्थानचे अध्यक्ष अ‍ॅड. मुकेश शर्मा व अन्य विश्वस्तांनी दिली.

येत्या 29 सप्टेंबरपासून नवरात्रोत्सव प्रारंभ होत आहे. मंदिर आणि परिसराचा विकास सुरु आहे. मंदिराच्या परिसरात मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरु आहेत.

विकास कामांचे साहित्य जागोजागी पडले असून त्यामुळे भाविकांना कोणताही त्रास होणार नाही, याची काळजी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. नवरात्रोत्सवात देवीच्या दर्शनाला लाखो कुटुंब येत असतात. अनेक जण या परिसरात विश्रांती घेतात, अनेक जण निवासही करतात. 24 तास या परिसरात भाविकांची गर्दी असते.

अशा स्थितीत विकास कामांच्या साहित्यामुळे कुणाला इजा होऊ नये व वावरताना अडचणी निर्माण होऊ नये, यासाठी सर्व साहित्य एकत्रित करून नवरात्रापर्यंत एका बाजूला स्थलांतरित करण्यात येणार आहे.

दिनांक 28 सप्टेंबर रोजी सकाळी महापूजेनंतर 10 वाजता मंदिर आणि गाभारा भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात येणार आहे. स्वच्छता, सुरक्षा, पार्किग व यात्रेदरम्यान भाविकांना सुचारू पध्दतीने दर्शन व्हावे म्हणून जास्तीत जास्त सुविधा देण्याचा मंदिर प्रशासनाचा प्रयत्न आहे.

राज्यपाल पुरोहित यांनी केली पाहणी
तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी आज सकाळी कोराडीच्या महालक्ष्मी जगदंबेचे दर्शन घेतले. याप्रसंगी त्यांच्या सोबत पालकमंत्री व मंदिराचे विश्वस्त चंद्रशेखर बावनकुळे होते. पुरोहित यांनी मंदिर परिसरात सुरु असलेल्या सर्व विकास कामांची पाहणी केली.

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांना जी विकास कामे सुरु आहेत, त्याची प्रत्यक्ष स्थळाजवळ जाऊन माहिती दिली. याप्रसंगी त्यांच्यासोबत मंदिराचे अध्यक्ष अ‍ॅड. मुकेश शर्मा व सचिव फुलझेले व अन्य विश्वस्त उपस्थित होते.