Published On : Mon, Dec 30th, 2019

कोराडी महालक्ष्मी देवी मंदिराला दोन चांदीच्या बादल्या अर्पण

नागपूर : कोराडी येथील महालक्ष्मी जगदंबा मंदिराला शुअरटेक हॉस्पिटलचे संस्थापक डॉ राजेंद्र देशमुख यांनी दोन चांदीच्या बादल्या अर्पण केल्या. या दोन चांदीच्या बादल्या साडे पाच किलो वजनाच्या असून त्याची अंदाजे किंमत 2 लाख 78 हजार असावी. या बादल्या जगदंबा मातेच्या स्नानासाठी अर्पण करण्यात आल्या आहेत

दिनांक 27 डिसेंबर रोजी रात्री 8 वाजता डॉ राजेंद्र देशमुख, त्यांच्या पत्नी सौ देशमुख, दीपक देशमुख, विजय, मेघना, शेवंताली देशमुख कोराडी मंदिरात आरतीसाठी आले असता त्यांच्या हस्ते देवीची पूजा करण्यात आली. त्यावेळी त्यांनी चांदीच्या दोन बादल्या जगदंबा मातेला अर्पण केल्या.

गुजराथ येथून या बादल्या मागविण्यात आल्या आहेत. कोराडी मातेला त्यांनी नवस केला होता. त्यांचा नवस पूर्ण झाला. त्यानंतर त्यांनी कबूल केलेल्या चांदीच्या बादल्या देवीला अर्पण केल्या. यावेळी देशमुख कुटुंबियांचे मंदिर संस्थानतर्फे शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी संस्थानचे अध्यक्ष ऍड मुकेश शर्मा, सचिव केशवराव फुलझेले, पुजारी प्रमोद फुलझेले, कर्मचारी गणेश राऊत उपस्थित होते.