
नागपूर : नागपूर पदवीधर मतदारसंघात महायुतीचे उमेदवार सुधाकर कोहळे यांना निवडून आणण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात प्रवास केला आहे. पदवीधरांना न्याय मिळवून देण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून सुधाकर कोहळे योग्य काम करू शकतात, असा मतदारांना विश्वास आहे. त्यामुळे सुधाकर कोहळे हे ३० हजार मतांच्या फरकाने निवडून येतील, असा विश्वास भाजप नेत्याने व्यक्त केला.
सामायिक शेतीच्या जमिनींच्या नोंदणीसंदर्भातील नव्या नियमावर बोलताना त्यांनी सांगितले की, यापूर्वी एकाच सातबाऱ्यावर अनेक व्यक्तींची नावे असताना त्यातील एखाद्या व्यक्तीकडून जमीन विकली जायची. मात्र, प्रत्यक्षात कोणाच्या वाट्याला किती जमीन येणार, यावरून वाद निर्माण होऊन न्यायालयात प्रकरणे दाखल होत होती. आता सामायिक शेतीची मोजणी करून प्रत्येकाचा हिस्सा निश्चित केल्याशिवाय विक्री आणि नोंदणी करता येणार नाही. तुकडेबंदी कायदा रद्द झाल्यामुळे निवासी वापरासाठी जमीन विकसित करून विक्री करण्याचा मार्गही मोकळा झाल्याचे त्यांनी सांगितले.
राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी, “दिवाळी आली की फटाके फुटतात, त्यामुळे दिवाळीचा एक फटाका फुटला,” अशी टोलेबाजी केली.
‘फ्रेंडशिप फाइल्स’ डॉक्युमेंटरीवर बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातील २५ वर्षांचा उल्लेख केला. देशाच्या विकासासाठी व्यावसायिकांशी संवाद साधणे आवश्यक असून, त्यांच्या समस्या समजून घेण्यासाठी बैठका होणे म्हणजे त्यांच्याशी चुकीचे संबंध असल्याचे सिद्ध होत नाही, असे ते म्हणाले. अदानी-अंबानी यांच्याशी संबंध असल्याच्या आरोपांवरून नकारात्मकता पसरवून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याची टीकाही त्यांनी केली.
मनोज जरांगे यांच्या आरोपांबाबत बोलताना त्यांनी, संबंधितांनी सरकारकडे रीतसर तक्रार केल्यास चौकशी केली जाईल, असे स्पष्ट केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही चौकशी करण्याची भूमिका मांडल्याचे त्यांनी सांगितले.
संजय राऊत यांच्या वक्तव्यावर टीका करताना त्यांनी अल्बेनियातील सर्वोच्च न्यायालयाला आग लावण्याच्या घटनेचा उल्लेख केला. अशा घटनांमधून समाजाने काय शिकावे, असा सवाल करत भारताचे संविधान मजबूत असून देशात अशा घटनांना समर्थन मिळणार नाही, असे ते म्हणाले.
फ्रान्समधील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरही त्यांनी भारतीय संविधान आणि लोकशाही व्यवस्था मजबूत असल्याचे सांगितले. भारतात अशा प्रकारच्या घटना घडणार नाहीत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
रोहित पवार यांच्या पत्रकार परिषदेवर टीका करताना त्यांनी, महाराष्ट्रात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केला. राज्यातील जनतेला दुष्काळी मदत आणि विकासाचे प्रश्न महत्त्वाचे असून, राजकीय नाट्याऐवजी विकासाच्या मुद्द्यांवर चर्चा व्हायला हवी, असे ते म्हणाले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना त्यांनी शाह यांचे जीवन देशाला मजबूत करण्यासाठी समर्पित असल्याचे सांगितले. समाजातील शेवटच्या घटकाच्या कल्याणासाठी ते कार्यरत असून, त्यांना उदंड आयुष्य लाभो, अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या.



