Published On : Tue, Jul 16th, 2019

राजा ढाले यांच्या निधनाने दलित चळवळीतील योद्धा हरपला ! विजय वडेट्टीवार

मुंबई: दलित पँथरचे संस्थापक, आंबेडकरी चळवळीचे नेते आणि विचारवंत राजा ढाले यांच्या निधनाने दलित चळवळीतील एक योद्धा हरपला, अशा शब्दात विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

राज ढाले यांच्या निधनाने बौद्ध साहित्यविश्व आणि दलित चळवळीचे मोठे नुकसान झाले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेवर आयुष्यभर ठाम राहून कडवा संघर्ष करणाऱ्या नेत्यांमध्ये त्यांची गणना होते. नामदेव ढसाळ, अरुण कृष्णाजी कांबळे यांच्या मदतीने त्यांनी दलित पँथरची स्थापना केली.

राजकारण आणि समाजकारण यात त्यांनी जीव ओतून काम केले. समाज, संस्कृती आणि राजकारणाचा अभ्यासक अशी त्यांची ओळख होती. अन्याय आणि अत्याचाराविरोधात त्यांनी नेहमीच आवाज उठवला. ते महान लेखक, कवी, समिक्षक आणि समाजचिंतक होते. त्यांनी तापसी, येरु, चक्रवर्ती, जातक, विद्रोह अशा अनियतकालिकांमधून लेखन केले. कविता, कथा, प्रस्तावना, तसेच अनेक संशोधनात्मक लेखही त्यांनी लिहिले. त्यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. राजा ढाले यांच्या निधनाने एक मोठी पोकळी निर्माण झाली असून त्यांची उणिव कायम जाणवत राहिल, असे वड्डेट्टीवार म्हणाले.