Published On : Sat, Nov 28th, 2020

जातीपातीच्या नावावर फक्त कमजोरच मत मागतात : खासदार रामदास तडस

वर्धा येथील सभेत संदीप जोशी यांच्या विजयाचा संकल्प

नागपूर/वर्धा : संदीप जोशी मागील अनेक वर्षांपासून सामाजिक, क्रीडा, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्य करीत आहेत. समाजातील तळागाळातील लोकांसाठी त्यांचे कार्य सातत्याने सुरू आहेत. विरोधकांकडे सांगण्यासाठी किंवा दाखविण्यासाठी कोणतेही सामाजिक वा विकासाचे मुद्दे नाहीत त्यामुळे ते जातीचे राजकारण करीत आहेत. मात्र जातीपातीच्या नावावर फक्त कमजोरच मतं मागतात, असा टोला वर्धा लोकसभा क्षेत्राचे खासदार रामदास तडस यांनी लगावला.

भाजप, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ), बहुजन रिपब्लिकन एकता मंच व खोरिप महायुतीचे अधिकृत उमेदवार संदीप जोशी यांच्या वर्धा येथील प्रचारसभेमध्ये ते बोलत होते.


पुढे बोलताना खासदार रामदास तडस म्हणाले, पदवीधर मतदारसंघातील मतदार हे जाणकार, सुज्ञ, हुशार आहेत. ते आपला प्रतिनिधी निवडताना त्याचे सामाजिक, शैक्षणिक कार्य पाहूनच मत देतील. जातीपातीचे राजकारण करून सुशिक्षितांची दिशाभूल करणाऱ्यांना ते त्यांची जागा दाखवतील हा विश्वास आहेच. समाजातील कुठल्याही नागरिकाच्या मदतीला कधीही धावून न जाणारे व उलट समाजाची दिशाभूल करणारेच आज निवडणुकीच्या रिंगणात उतरले तर जातीचा दाखला देत आहेत. निवडणूक ही विकास कामे ते करण्यासाठीचे दृष्टीकोन या मुद्द्यांवर लढली जाणे अपेक्षित आहे.

मात्र सुशिक्षित पदवीधरांच्याही निवडणुकीमध्ये जातीचे राजकारण करून गालबोट लावण्याचे षडयंत्र आखले जात आहे. अशांना त्यांची जागा दाखविण्याची योग्य वेळ येत्या १ डिसेंबरला आली आहे. त्यामुळे समाजकार्य आणि विकासाचे दृष्टीकोन असणाऱ्यांच्या विरोधात जातीचे दंड थोपटून उभे राहणाऱ्यांचे डिपॉझिट जप्त होईल, असा धडा त्यांना शिकवा, असे आवाहनही खासदार रामदास तडस यांनी केले.