Published On : Fri, May 13th, 2022

खासदार क्रीडा महोत्सवाचे पद्मश्री धनराज पिल्ले यांच्या हस्ते थाटात उद्घाटन

भविष्यात नागपुरातून धनराज पिल्लेंसारखे खेळाडू पुढे यावेत : ना. नितीन गडकर

नागपूर: खेळातून व्यक्तित्व आणि चरित्राचा विकास होतो. आज तंत्रज्ञानात गुरफटत चाललेल्या मुलांना मैदानात खेळण्यासाठी आणण्याची गरज आहे. नागपूर शहरातील सुमारे १ लाख खेळाडू शहरातील ४५०च्या वर मैदानावर खेळत राहावे व त्यातून त्यांनी आपले शहर आणि देशाचा विकास करावा हा खासदार क्रीडा महोत्सवाचा उद्देश आहे. शहरातील खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे यासाठी महोत्सवात पद्मश्री धनराज पिल्ले यांच्यासारख्या महान खेळाडूंना आमंत्रित केले जाते. त्यांच्या खेळातील कामगिरीची प्रेरणा घेऊन शहरातूनही असे अनेक धनराज पिल्ले घडावेत, अशी अपेक्षा केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.

Advertisement

केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या आणि हजारो खेळाडूंसाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील संधीचे मोठे व्यासपीठ ठरलेल्या खासदार क्रीडा महोत्सवाचे शुक्रवारी (१३ मे) मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलात भारतीय हॉकी संघाचे माजी कर्णधार पद्मश्री धनराज पिल्ले यांच्या हस्ते थाटात उद्घाटन झाले. यावेळी ते बोलत होते.

मंचावर भारतीय हॉकी संघाचे माजी कर्णधार पद्मश्री धनराज पिल्ले, माजी केंद्रीय मंत्री श्री. हंसराज अहीर, माजी मंत्री आमदार श्री. परिणय फुके, आमदार विकास कुंभारे, अखिल भारतीय सॉफ्टबॉल असोसिएशनच्या अध्यक्ष नीतल नारंग, खासदार क्रीडा महोत्सवाचे संयोजक माजी महापौर श्री. संदीप जोशी, माजी महापौर दयाशंकर तिवारी, माजी आमदार सर्वश्री सुधाकर देशमुख, गिरीश व्यास, सुधाकर कोहळे, डॉ. मिलींद माने, जयप्रकाश गुप्ता, काटोल नगर परिषदेचे अध्यक्ष श्री. चरणसिंग ठाकुर आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी म्हणाले, खासदार क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून शहरात क्रीडा विषयक वातावरण तयार होत असून शहरातील खेळाडूंसह, पालकांनीही मुलांना खेळाकडे वळवण्यासाठी प्रोत्साहित करावे. कोव्हिडमुळे स्थगित करावा लागलेला खासदार क्रीडा महोत्सव आज पुन्हा सुरू होत असल्याचा आनंद आहे. शहरातील गरीबातील गरीब मुलांनाही खेळाचे व्यासपीठ मिळणे व त्याने त्याच्या प्रतिभेच्या बळावर पुढे जावे हा त्याचा हक्क मिळवून देण्याचे काम खासदार क्रीडा महोत्सव करीत आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर जाणाऱ्या खेळाडूंच्या मागे खासदार क्रीडा महोत्सव समिती संपूर्ण ताकदीने उभी राहिल, अशी ग्वाही सुद्धा त्यांनी दिली.

दिव्यांगांनी सर्वांच्या बरोबरीत यावे, ते खेळातही पुढे यावे या हेतूने यावर्षी महोत्सवात दिव्यांगांच्या स्पर्धा होत असल्याचा आनंद असल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले. येत्या काळात दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष स्पर्धा आयोजित करण्याची सूचना त्यांनी यावेळी खासदार क्रीडा महोत्सवाचे संयोजक माजी महापौर श्री. संदीप जोशी यांना केली.

परिश्रम, खेळ आणि देशावर प्रेम ; खेळाडूंच्या यशाची त्रिसूत्री : पद्मश्री धनराज पिल्ले

हरूनही जिंकण्याची संधी फक्त खेळातच मिळते. स्वतः या सर्व गोष्टींचा सामना केल्याने त्याचे महत्व माहित आहे. खेळण्याची आवड आणि आत्मविश्वास या गोष्टींनी पुढे जाण्यात मोठी मदत केली. परिश्रम करण्याची क्षमता, आपल्या खेळावर प्रेम आणि आपल्या देशावर प्रेम ही त्रिसूत्री प्रत्येक खेळाडूने आत्मसात केल्यास त्याला यश मिळेल, असा संदेश भारतीय हॉकी संघाचे माजी कर्णधार पद्मश्री धनराज पिल्ले यांनी खासदार क्रीडा महोत्सवात दिला.

यावेळी त्यांनी आपला जीवन प्रवास आणि खेळातील कारकिर्दीतील काही बाबी सांगितल्या. खडकी पुणे या छोट्याशा पाड्यातून पुढे येऊन ४ विश्वचषक, ४ ऑलिम्पिक, ४ आशियाई स्पर्धा खेळणारा देशातील एकमेव खेळाडू बनणे ही बाब स्वतःसाठी गौरवास्पद आहे. मात्र या यशात आईवडीलांचे मोठे योगदान आहे. प्रत्येक खेळाडूने आपले आईवडील आणि प्रशिक्षक यांचा आदर करणे आवश्यक आहे, असे सांगतानाच त्यांनी खेळाडूंना मन लावून सराव करा, ज्या क्षेत्रात असणार ते मनापासून करा, असा मोलाचा संदेशही दिला.

देशातील विकासकामे आणि नागपुरात आयोजित होत असलेला भव्य खासदार महोत्सवाबद्दल पद्मश्री धनराज पिल्ले यांनी केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांचे विशेष अभिनंदन केले. एखाद्या राज्यातही खेळाडूंना ९३ लाखांचे पुरस्कार दिले जात नसावेत मात्र खेळ आणि खेळाडूंच्या विकासासाठी घेतलेला हा पुढाकार खेळाप्रति आणि आपल्या शहरातील खेळाडूंप्रति प्रेम दर्शविणारा आहे, अशा शब्दांत त्यांनी ना. नितीन गडकरी यांचा गौरव केला.

महोत्सवातून शहराला आंतरराष्ट्रीय खेळाडू मिळाले : संदीप जोशी

प्रास्ताविकामध्ये खासदार क्रीडा महोत्सवाचे संयोजक माजी महापौर श्री. संदीप जोशी यांनी महोत्सवाची सविस्तर माहिती सादर केली. खासदार क्रीडा महोत्सवात खेळलेले खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर नागपूर शहर आणि देशाचे नावलौकिक करत आहेत ही शहरासाठी अभिमानास्पद बाब आहे, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी शहराला मिळालेल्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या कार्याचा गौरव केला. यावर्षी २३ मे रोजी एकाच दिवशी दिव्यांगांच्या होणाऱ्या १६ स्पर्धा हे यावर्षीच्या खासदार क्रीडा महोत्सवाचे वैशिष्ट्य असल्याचेही त्यांनी सांगितले.

खासदार क्रीडा महोत्सवाच्या अंतर्गत २८ मे पर्यंत १६ दिवस ३४ खेळांच्या स्पर्धा एकाचवेळी ४० मैदानांवर चालतील. यामध्ये एकूण ९२३७ सामने खेळविण्यात येणार असून ५६० चषक, ७८३० पदक देण्यात येणार असून या क्रीडा महोत्सवाच्या रणसंग्रामात तब्बल ४० हजार खेळाडूंचा सहभाग असणार आहे. विजेत्यांना ९३ लक्ष रुपयांचे रोख पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. खासदार क्रीडा महोत्सवामध्ये सॉफ्टबॉल, योगासन, कबड्डी, बास्केटबॉल, सायकलिंग, बेंच प्रेस पॉवरलिफ्टिंग, कॅरम, खो-खो, तिरंदाजी, बुद्धिबळ, तलवारबाजी, हॉकी, कुस्ती, ॲथलेटिक्स, बॅडमिंटन, हँडबॉल, गर्ल्स बॉक्स क्रिकेट, व्हॉलिबॉल, तायक्वांडो, टेबल टेनिस, जलतरण, मॅरेथॉन, बॉडी बिल्डिंग, फुटबॉल, मलखांब, सेपक टॅकरॉ, रस्सीखेच, ज्यूडो, बॉक्सिंग, टेनिस, फुटसल, जिम्नॅस्टिक, रायफल शुटिंग आदी खेळांच्या स्पर्धांसह दिव्यांगांसाठी सुद्धा स्पर्धा घेण्यात येणार आहेत. केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतील क्रीडा महोत्सव नुकताच भंडारा-गोंदिया जिल्ह्यात आयोजित करण्यात आले. आता ते वर्धा येथेही घेण्यात येणार आहे. खासदार क्रीडा महोत्सवाने क्रीडा क्षेत्र आणि खेळाडूंसाठी नवा आदर्श निर्माण केला असून त्याची वाढणारी व्याप्ती ही खेळ आणि खेळाडूंच्या विकासासाठी महत्वाची ठरणार आहे, असेही ते म्हणाले.

योगासन, रोप मलखांबचा थरार अन लेझीमचा ठेका

द्रोणाचार्य पुरस्कार विजेते श्री. विजय मुनीश्वर यांनी खासदार क्रीडा महोत्सवाचे ध्वजारोहण केले. आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये शहराचे नाव लौकिक करणारे खेळाडू निकिता राऊत, कल्याणी चुटे, शुभम वंजारी आणि विधी तराडे हे खासदार क्रीडा महोत्सवाची मशाल घेऊन मंचावर आले. पद्मश्री धनराज पिल्ले व केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांनी मशाल पेटवून महोत्सवाचे उद्घाटन केले. खासदार क्रीडा महोत्सवात घेण्यात येत असलेल्या सर्व स्पर्धांच्या चमूद्वारे पथसंचलन करण्यात आले. यावेळी ‘इंडियाज गॉट टॅलेंट’मध्ये सहभाग घेतलेल्या अमित माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट योगाचे प्रात्यक्षिक सादर केले. शौर्य स्पोर्ट्स अकादमीच्या खेळाडूंनी श्री. प्रवीण केचे यांच्या मार्गदर्शनात रोप मलखांबचे प्रात्यक्षिक सादर केले. केशवनगर माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ढोल ताशाच्या तालावर लेझीमचे सादरीकरण केले. झिरो माईल बँडच्या चमूने सादर केलेल्या गाण्यांवर उपस्थितांनी चांगलाच ठेका धरला. पद्मश्री धनराज पिल्ले यांनी सर्व खेळाडूंना शपथ दिली. यापूर्वी त्यांनी स्टेडियम मध्ये चौफेर हॉकीने चेंडूला फटका मारून महोत्सवाचे उद्घाटन केले.

कार्यक्रमाला शहरातील क्रीडा संघटक, प्रशिक्षक, खेळाडू प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन अँकर अमोल यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी खासदार क्रीडा महोत्सव समितीचे पीयूष आंबुलकर, नागेश सहारे, डॉ. पद्माकर चारमोडे, डॉ. संभाजी भोसले, डॉ. विवेक अवसरे, सचिन देशमुख, अशफाक शेख, अमित संपत, सतीश वडे, सचिन माथाने, सुनील मानेकर, लक्ष्मीकांत क्रिपाने, आशिष मुकीम, प्रकाश चंद्रायण आदींनी सहकार्य केले.

Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement