Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Tue, Sep 5th, 2017

  राधाकृष्णन्‌ सारखा आदर्श अंगी बाळगा – महापौर नंदा जिचकार

  नागपूर: शिक्षकांनी सर्वपल्ली राधाकृष्णन्‌ यांचा आदर्श आचरणात आणावा. त्यांच्यासारखे आपले चरित्र असावे याचा प्रयत्न करावा. आपल्या आचरणातूनच विद्यार्थ्यांवर संस्कार घडतात व विद्यार्थी घडत असतो, असे प्रतिपादन महापौर नंदा जिचकार यांनी केले.

  महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातर्फे शिक्षक दिन समारंभ मंगळवारी (ता.५) विदर्भ साहित्य संघाच्या सांस्कृतिक सभागृहात पार पाडला. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर शिक्षक परिषदेचे आमदार नागो गाणार, उपमहापौर दीपराज पार्डीकर, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, शिक्षण समिती सभापती दिलीप दिवे, क्रीडा समिती सभापती नागेश सहारे, उपसभापती प्रमोद तभाने, स्थापत्य व प्रकल्प समिती सभापती संजय बंगाले, धरमपेठ झोन सभापती रूपा राय, मनपातील भाजपच्या प्रतोद दिव्या धुरडे, शिक्षण समिती सदस्य राजेंद्र सोनकुसरे, उज्ज्वला बनकर, प्रमिला मंथरानी, , नगरसेवक सुनील हिरणवार, नगरसेविका उज्ज्वला शर्मा, शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार, शिक्षक संघटनेचे अध्यक्ष राजेश गवरे प्रामुख्याने उपस्थित होते.

  पुढे बोलताना महापौर म्हणाल्या, महानगरपालिकेच्या विद्यार्थांना घडविण्यात मनपाच्या शिक्षकांचे योगदान शंभर टक्के आहे. त्याबद्दल मी त्यांचे प्रथम कौतुक करते. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना घडविताना शालेय शिक्षणाबरोबरच त्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजे. आज मनपाच्या शाळांची अवस्था बिकट आहे. त्याचा दर्जा सुधारण्यात शिक्षकांची भूमिका ही महत्त्वाची आहे. महानगरपालिकेचे नाव कसे उंचावेल यासाठी विशेष प्रयत्न केले पाहिजे. मनपाच्या शाळांचे नाव देशातील पहिल्या १० शाळांमध्ये यावे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वप्न आहे. ते स्वप्न नक्कीच पूर्ण करण्याचा प्रयत्न मनपाचे शिक्षक करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

  शिक्षक परिषदेचे आमदार नागो गाणार म्हणाले, मी मनपाच्या शाळेमुळेच घडलो. माझी ओळख निर्माण करून देण्यात मनपाच्या शाळेचे योगदान मोलाचे आहे. शिक्षण विभागाच्या झालेल्या दुर्देशेवर नुसतीच चर्चा न करता त्याला कसे सुधारता येईल यासाठी प्रयत्न करा, असा सल्ला त्यांनी यावेळी बोलताना दिला. सध्या खासगी शाळेचे वाढते प्रस्थ हे आपल्यासमोरील आव्हान आहे. त्या आव्हांनाना पेलत शिक्षकांनी आपले कर्तव्य पार पाडत आपल्यावरची जबाबदारी निष्ठेने पार पाडावी. असे केल्यास मनपाच्या शाळांचे स्थान नक्कीच उंचावेल असा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

  विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे यांनी महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने घेतलेले कष्ट हे खरंच दखल घेण्याजोगे आहे. मनपाच्या शाळांचे नाव उंचावण्याचे सामर्थ्य त्यांच्यात असल्याचे सांगितले.

  शिक्षक दिनाचे औचित्य साधून प्रसंगी मनपाच्या संजयनगर हिंदी माध्यामिक शाळेचे सुधाकर आमधरे, मनिषा मोगलेवार, अशोक चौधरी यांना ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल १२ शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. सन् २०१६-२०१७ या शैक्षणिक सत्रात सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. ३१ जुलै २०१७ ला राजू डोनारकर यांच्याकडे आग लागली होती. तेव्हा दुर्गा नगर माध्यामिक शाळेचा विद्यार्थी अविनाश शेंडे याने धाडस दाखवून त्या घरातील इलेक्ट्रीक स्वीच व सिलेंडरचे कॉक बंद केले. आत अडकलेल्या ३ महिलांना सुखरूप बाहेर काढले. या त्याच्या धाडसाबद्दल त्याचा सत्कार महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते करण्यात आला.

  प्रारंभी दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे सुरवात झाली. मान्यवरांचे स्वागत शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार, सहायक शिक्षणाधिकारी कुसूम चापलेकर, क्रीडा निरीक्षक नरेश चौधरी, सौ. देशकर यांनी केले. यावेळी मनापातील शाळेच्या विद्यार्थांनी गणपती अथर्वशीर्ष व स्वागत गीत सादर केले. कार्यक्रमाचे संचालन मधु आव्हाड यांनी केले. आभार क्रीडा निरीक्षक नरेश चौधरी यांनी मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

  Trending In Nagpur
  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145