Published On : Wed, Jul 14th, 2021

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी यंत्रणा अद्ययावत ठेवा – लवंगारे

Advertisement

– सुविधांचा घेतला आढावा ,सामान्य रुग्णालयाला भेट, सनफ्लॅग प्राणवायू प्रकल्पाची पाहणी, जम्बो कोविड रुग्णालयाच्या जागेची पाहणी

भंडारा – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत भंडारा जिल्हा प्रशासनाने मूलभूत आरोग्य सुविधांचे योग्य नियोजन करून जिल्ह्याला कोरोनामुक्तीच्या वाटेवर आणून ठेवल्याबद्दल प्रशासनाचे कौतुक करतांनाच दुसऱ्या लाटेत जाणवलेल्या उणिवा दूर करून संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी आरोग्य यंत्रणा अद्ययावत व सज्ज ठेवा, अशा सूचना विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी दिल्या. विभागीय आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर त्या प्रथमच जिल्हा दौऱ्यावर आल्या असता त्यांनी विविध विषयांचा आढावा घेतला.

Gold Rate
15 May 2025
Gold 24 KT 92,100/-
Gold 22 KT 85,700/-
Silver/Kg 94,800/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

जिल्हाधिकारी संदीप कदम, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मुन, जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव, अप्पर जिल्हाधिकारी घनश्याम भुगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन पानझाडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आर. एस. फारुकी, उपविभागीय अधिकारी रविंद्र राठोड, नितीन सदगीर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत उईके, तहसीलदार अक्षय पोयाम, साहेबराव राठोड, यावेळी उपस्थित होते.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा अनुभव पाहता ऑक्सिजन निर्मितीमध्ये जिल्हा स्वयंपूर्ण व्हावा यासाठी सामान्य रुग्णालय भंडारा येथे ऑक्सिजन प्लॅन्ट उभारण्यात येत आहे. तसेच प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी ऑक्सिजन प्लॅन्ट व 70 खाटांचे कोविड रुग्णालय उभारण्यात येत आहे. त्याचप्रमाणे लहान मुलांसाठी सामान्य रूग्णालयात अद्ययावत व सर्व सोई सुविधायुक्त विशेष वार्ड तयार करण्यात आले आहेत. या सर्व सुविधांची पाहणी करून त्यांनी समाधान व्यक्त केले.

सामान्य रुग्णालयातील प्राणवायू प्रकल्प, पेडियाट्रिक वार्ड, कोविड वार्ड, आयसीयू वार्ड, आरटीपीसीआर चाचणी केंद्र आदी ठिकाणी भेट देऊन त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. सामान्य रुग्णालयात वैद्यकीय सोई सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. तिसऱ्या लाटेच्या पूर्व तयारीची त्यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी आरोग्य कर्मचारी व अधिकाऱ्यांशी संवाद साधला. कोविड काळात उत्तम काम केल्याबद्दल श्रीमती लवंगारे यांनी आरोग्य विभागाची प्रशंसा केली.

दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची मागणी निर्माण झाली होती. सनफ्लॅग कंपनी मधील ऑक्सिजन प्रकल्पातून ऑक्सिजन पुरवठा करण्यात आला होता. या प्रकल्पाला आज त्यांनी भेट दिली. त्याचप्रमाणे तिसऱ्या संभाव्य लाटेची पूर्वतयारी म्हणून सनफ्लॅग कंपनी जवळ 500 खाटांचे जम्बो कोविड रुग्णालय उभारण्यात येणार आहे. या जागेची पाहणी करून त्यांनी सूचना केल्या. हे जम्बो रुग्णालय निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले.


कोरोनामुक्त गाव करण्यावर भर द्या
कोरोनामुक्त गाव करण्यावर भर देण्यात यावा असे सांगून श्रीमती लवंगारे म्हणाल्या की, कोरोनामुक्त गावात शाळा सुरू होतील असे नियोजन करावे. विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू करणे आवश्यक असून सर्व खबरदारी घेऊन याबाबत पावले उचलावीत. क्रियाशील रुग्ण नाहीत तसेच शून्य रुग्ण असलेल्या गावांना प्राधान्य देण्यात यावे.

धान खरेदी व धान भरडाईचा आढावा त्यांनी या बैठकीत घेतला. धान भरडाई बाबत मिलरची बैठक घेतली असून हा विषय मार्गी लागला असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. बारदाना कमी आहे तो पुरेसा मिळावा यासाठी पाठपुरावा सुरू आहे. कोरोना मुळे बारदाना उत्पादन करणाऱ्या कारखान्यांनी उत्पादन कमी केले. ही खरी अडचण असल्याचे यावेळी सांगण्यात आले. गोसेखुर्द पुनर्वसन, सातबारा संगणकीकरण, रेती घाट लिलाव, नगरपालिका कर वसुली, लसीकरण यासह विविध विषयांचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीला सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व मुख्याधिकारी उपस्थित होते.

रूट मार्च चे कौतुक
कोरोनाची ‘ब्रेक द चैन’ करण्यासाठी शासनाने काही निर्बंध शिथिल केले असता बाजारपेठेतील गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाने भंडारा शहरासह प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी ‘रूट मार्च’ द्वारे जनजागृती केली. त्यामुळे कोरोना रुग्ण संख्या नियंत्रणात ठेवण्यात यश आले. लोकांमध्ये जागृती झाली. त्याचाच परिणाम म्हणून आज जिल्हा कोरोनामुक्त होण्याच्या मार्गावर आहे. या प्रयोगाची श्रीमती लवंगारे यांनी प्रसंशा केली. जिल्हाधिकारी संदीप कदम व जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांचे कौतुक केले.

Advertisement
Advertisement
Advertisement