Published On : Wed, Jul 14th, 2021

अतिरिक्त आयुक्त दीपककुमार मीणा यांनी कार्यभार स्वीकारला

नागपूर : नागपूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून श्री. दीपककुमार मीणा यांनी बुधवारी (ता. १४) पदाचा कार्यभार स्वीकारला. यापूर्वीचे अतिरिक्त आयुक्त श्री.जलज शर्मा यांची धुळे जिल्हाधिकारी म्हणून बदली झाल्यानंतर रिक्त पदावर त्यांची नियुक्ती महाराष्ट्र शासनाने केली आहे.

कार्यभार स्वीकारल्यानंतर श्री. दीपककुमार मीणा यांनी मनपा आयुक्त श्री. राधाकृष्णन बी. यांची भेट घेतली. तसेच नागपूर स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती भुवनेश्वरी एस यांनी श्री. मीणा यांची भेट घेतली.

मूळचे राजस्थानचे असलेले दीपककुमार मीणा हे सन २०१३ च्या बॅचचे आय.ए.एस. अधिकारी आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथील प्रशिक्षणार्थी उपविभागीय अधिकारी म्हणून प्रथम नियुक्ती झाली. यानंतर नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी, त्यानंतर वाशिम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी म्हणून त्यांनी कार्य केले. यानंतर गोंदियाचे जिल्हाधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती झाली. आता ते नागपूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यभार बघतील.