Published On : Sat, Aug 5th, 2017

परिसर स्वच्छ ठेवून शहर निरोगी ठेवा : महापौर नंदा जिचकार


नागपूर:
शिक्षकांनी शाळांमधून विद्यार्थ्यांवर स्वच्चछतेचे संस्कार रुजवावे. विद्यार्थ्यांनीही परिसराच्या स्वच्छतेची पर्यायाने शहराच्या स्वच्छतेची जबाबदारी पार पाडावी. परिसरात पाणी साचून राहणार नाही, याची काळजी घ्यावी. डेंग्यू डासांच्या अळ्यांच्या निर्मितीचे केंद्र असणारे साचलेले पाणी दिसेल तेथे स्वच्छ करावे. साचलेल्या पाण्यात गप्पी मासे सोडावे. परिसर स्वच्छ ठेवून शहर निरोगी ठेवण्यास हातभार लावा, असे प्रतिपादन महापौर नंदा जिचकार यांनी केले.

कीटकजन्य आजारासाठी पारेषण काळ असलेल्या या काळात किटकांची निर्मितीच होऊ नये यासाठी जनजागरण करण्याच्या दृष्टीने शनिवारी (ता. ५) शहरातील सुमारे १६० शाळांसह मनपा आणि राज्य शासनाच्या कार्यालयात शपथ घेण्यात आली. लक्ष्मीनगर झोन अंतर्गत येणाऱ्या प्रतापनगर माध्यमिक शाळेत महापौर नंदा जिचकार यांनी कीटकजन्य आजाराचा समूळ नायनाट करण्याची शपथ विद्यार्थ्यांना दिली. त्यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी मंचावर हिवताप व हत्तीरोग अधिकारी जयश्री थोटे, हिवताप निरीक्षक ओमप्रकाश सोमकुंवर, प्रतापनगर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. प्रकाश शुक्ला, सचिव श्याम कायंदे, मुख्याध्यापिका मंजूश्री टिल्लू, प्रभात खडतकर उपस्थित होते.


प्रारंभी हिवताप व हत्तीरोग अधिकारी जयश्री थोटे यांनी प्रास्ताविकातून कीटकजन्य रोगाबद्दल माहिती दिली. डासांची उत्पत्ती कशी होते, याबाबत माहिती दिली. साचलेल्या पाण्यात डेंग्यूच्या अळ्या तयार होतात. यातून डासांची निर्मिती होते. त्यामुळे अशा प्रकारच्या अळ्याच निर्माण होऊ नये, यासाठी काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

संचालन शिक्षक विजय वानखेडे यांनी केले. आभार नंदिनी सावसाकडे यांनी मानले. कार्यक्रमाला हिवताप व हत्तीरोग विभागाचे विनय साखरे, सुनील बनकर, महेंद्र वासनिक यांच्यासह शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


१६० शाळांतील विद्यार्थ्यांनी घेतली शपथ

शहरातील विविध भागातील सुमारे १६० शाळांतील विद्यार्थ्यांना संबंधित परिसरातील नगरसेवकांनी शपथ दिली. उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती संदीप जाधव, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, बसपा पक्ष नेते मोहम्मद जमाल यांच्यासह सर्व पदाधिकारी या मोहिमेत सहभागी झाले होते.