Published On : Tue, May 22nd, 2018

पावसाळ्यातील संभाव्य नैसर्गिक आपत्ती वर उपाययोजना म्हणून प्रशासन यंत्रणा सज्ज ठेवा : महापौर

Advertisement

Virendra Singh, Mayor Jichkar and Kumbhare

नागपूर: पावसाळ्यातील संभाव्य नैसर्गिक आपत्ती वर उपाययोजना म्हणून महापालिकेची यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले. मंगळवार (ता.२२) मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीत मान्सूनपूर्व तयारीची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी आयुक्त विरेंद्र सिंह, अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, अतिरिक्त उपायुक्त राजेश मोहिते, कार्यकारी अभियंता (विद्युत) संजय जैस्वाल, कार्यकारी अभियंता (जलप्रदाय) संजय गायकवाड, कार्यकारी अभियंता अनिरूद्ध चौंगजकर, कार्यकारी अभियंता मोती कुकरेजा, कार्यकारी अभियंता सतीश नेरळ, सी.जी. धकाते, मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके प्रामुख्याने उपस्थित होते.

प्रशासनाने केलेल्या मान्सूनपूर्व तयारीचा आढावा महापौरांनी अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे आणि मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांच्यामार्फत घेतला. महापालिकेद्वारे नैसर्गिक पूर प्रतिबंधक आराखडा १ जून ते ३० सप्टेंबरपर्यंत राबविण्यात येणार आहे. झोनस्तरावर एक नियंत्रण कक्ष स्टॅण्डर्ड ऑपरेटिंग सिस्टीम दोन दिवसात उभारण्याचे निर्देश आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी दिले. दहाही झोनमधील नियंत्रण कक्षातील आपतकालीन मोबाईल क्रमांकांची यादी मुख्यालयातील नियंत्रण कक्षाला देण्यात यावी, असे आदेश आयुक्तांनी दिले. नियंत्रण कक्षाला अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त यांच्या पथकाने आकस्मिक भेट द्यावी, त्याठिकाणी गैरहजर असलेल्या अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी दिले.

रस्त्यांवरील झाडांच्या वाढलेल्या फांद्याची छाटणी करण्याचे आदेश महापौर नंदा जिचकार यांनी संबंधित विभागाला दिले. झोनमध्ये असलेले पाणी उपसण्याचे पंप, मशीन्स व पावसाळ्यात लागणारे उपकरणे दुरूस्त करून ठेवण्याचे व झोननिहाय उपकरणे, पंप, मशीन्स याची यादी मुख्य अग्निशमन अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात यावी, असे आदेश आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी दिले. जीर्ण झालेल्या इमारतींची यादी तयार करून त्या इमारतींची माहिती झोन सहायक आयुक्ताला द्यावी, असे निर्देश आयुक्तांनी दिले.

शहरातील ज्या भागात पावसाचे पाणी शिरते, ते भाग ओळखून त्या ठिकाणी असलेले रहिवासी व अतिक्रमणधारकांना नोटीस देण्यात यावी, गरज पडल्यास त्यांना सुरक्षा स्थळी पोहचविण्याची सूचना अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे यांनी केली. प्रत्येक झोनमधील एखादे सुरक्षा स्थळ सहायक आयुक्तांनी शोधून ठेवावे, असेही निर्देश आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी दिले.

गडरलाईन स्वच्छ करण्यात यावी, गडर उघडे असतील तर त्यावर पावसाळ्यापूर्वी झाकणे लावण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे यांनी दिले. दर पावसाळ्यात नरेंद्र नगर पुलाखाली पाणी साचते त्याची पर्यायी सोय प्रशासनाने काय केली आहे, याचा आढावा महापौरांनी घेतला. त्यावर नरेंद्र नगर पुलाखाली पाणी साचल्यास तो रस्ता बंद करण्यात यावा, पर्यायी रस्त्याचा वापर करण्याची सूचना देणारा फलक त्या ठिकाणी लावण्याचे आदेश आयुक्त वीरेंद्र सिंग यांनी दिले. अशाच प्रकारच्या घटना ज्या ठिकाणी घडत असेल त्या ठिकाणी सूचना फलक लावण्यात यावे, असेही निर्देश आयुक्तांनी दिले. पावसामुळे रस्त्यावर खड्डे तयार होतात. जर पाऊस सुरू असेल तर तात्पुरते माती टाकून खड्डे बुजविण्यात यावे, पाऊस संपल्यानंतर कायमस्वरूपी खड्डे बुजविण्यात यावे, असे निर्देश अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे यांनी दिले.

बैठकीला उपअभियंता प्रदीप राजगिरे, शकील नियाजी, श्री.खोत, सर्व झोन सहायक आयुक्त, संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.