Published On : Fri, Nov 15th, 2019

शाळा, हॉस्पीटल परिसरात ‘सायलेंस झोन’ राखावा : राम जोशी

Advertisement

पर्यावरण नागरी नियंत्रण कृती समितीची बैठक

नागपूर : शहरातील शाळा, दवाखाने आदी ‘सायलेंस झोन’मध्ये येतात. याठिकाणी फटाके फोडणे, मोठ्या आवाजात डीजे वाजविणे कायद्याने गुन्हा आहे. या परिसरात शांतता राखावी, असे आवाहन नागपूर महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी केले.

Gold Rate
15 May 2025
Gold 24 KT 92,100/-
Gold 22 KT 85,700/-
Silver/Kg 94,800/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

शासनाच्या राष्ट्रीय हरित लवाद, मुख्य खंडपीठाच्या आदेशानुसार हवेच्या गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी व प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी स्थानिक स्तरावर पर्यावरण नियंत्रण नागरी कृती समिती आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली तयार करण्यात आली आहे. समितीची बैठक मनपा मुख्यालयातील अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांच्या कक्षात गुरूवारी (ता. १४) पार पडली.

यावेळी कार्यकारी अभियंता (जलप्रदाय) श्वेता बॅनर्जी, समितीच्या सदस्य सचिव तथा पर्यावरण नियंत्रण महामंडळाच्या उपप्रादेशिक अधिकारी हेमा देशपांडे, क्षेत्र अधिकारी शीतल उदाडे, आरोग्य अधिकारी डॉ.सुनील कांबळे, स्वच्छ भारत अभियानचे नोडल अधिकारी डॉ.प्रदीप दासरवार, उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार, नागपूर सुधार प्रन्सासचे अभियंता प्रमोद धनकर, प्रादेशिक वाहतूक विभागाचे विनोद जाधव, पोलिस विभागाचे ओम सोनटक्के, सहायक अभियंता रूपराव राऊत, सार्वजनिक आरोग्य अभियंता संदीप लोखंडे प्रामुख्याने उपस्थित होते.

शाळा, दवाखाने आदीच्या परिसरात मंगल कार्यालये असतात. त्या ठिकाणी होणाऱ्या कर्णकर्कश आवाजामुळे विद्यार्थी, रुग्ण व परिसरातील नागरिकांना त्रास होतो. याबाबत वारंवार तक्रार होते. याकरिता पोलिस विभागाच्या माध्यमातून मंगल कार्यालयांना कमी आवाज ठेवण्याच्या संदर्भातील पत्र देण्यात यावे, असे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी सांगितले. राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशानुसार हवेच्या गुणवत्तेतील सुधारणा, प्रदूषण नियंत्रणासंबधीचा कृती आराखडा सहा महिन्यांत तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. या कृती आराखड्याच्या दृष्टीने काय तयारी कऱण्यात आली आहे, याचा आढावा यावेळी अतिरिक्त आय़ुक्त राम जोशी यांनी घेतला.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाद्वारे शहरात एकूण चार ठिकाणी सतत हवा गुणवत्ता तपासणी संयंत्र लावण्यात येणार होते. यापैकी एक संयंत्र लावण्यात आले असून उर्वरित तीन संयंत्रासाठी जागा शोधण्याचे कार्य सुरू आहे. काही जागा ठरविल्या आहेत. त्या जागा मिळण्यासाठी संबंधित विभागांशी चर्चा कऱण्यात येत असल्याचे उपप्रादेशिक अधिकारी हेमा देशपांडे यांनी सांगितले. शहरात काही ठिकाणी प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी हरित क्षेत्र उभारण्यासंदर्भात बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली. रस्ता दुभाजकावर वृक्षलागवड, रस्त्याच्या कडेला झाडे लावणे हे समितीच्या कामात अंतर्भूत आहे. ज्या ठिकाणी प्रदूषण मोठ्या प्रमाणावर आहे, असे क्षेत्र ठरवून त्याठिकाणी उद्यान विभागामार्फत वृक्षलागवड करण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिले.

महानगरपालिकेच्या उद्यानांमध्ये कंपोस्ट खतनिर्मितीसंदर्भात बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली. बगीच्यामधील पालापचोळा व कचरा कंपोस्टींगच्या ठिकाणी गोळा करण्य़ात यावा व त्याठिकाणी शेड लावण्यात यावे, असे निर्देश राम जोशी यांनी दिले. प्रदूषण नियंत्रणाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती अत्यंत महत्त्वाची आहे. याबाबत महानगरपालिकेद्वारे काय उपाययोजना करण्यात येतात, याचा आढावा राम जोशी यांनी घेतला. मनपाद्वारे सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत असल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी यांनी दिली. कचरा गोळा करण्यासाठी येणाऱ्या व्यक्तीस कचरा विलगीकरणासंदर्भात अवगत करण्यात यावे, याशिवाय कचरा गाडीवर कचरा विलगीकरणासंदर्भात माहिती देणारे फलक लावावे, असे निर्देश राम जोशी यांनी दिले. बैठकीमध्ये मेकॅनिकल स्ट्रीट स्वीपर व वॉटर स्प्रींकलबाबत चर्चा करण्यात आली. मेकॅनिकल स्ट्रीट स्वीपरबाबत निविदास्तरावर प्रकीया सुरू असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ.सुनील कांबळे यांनी दिली.

Advertisement
Advertisement
Advertisement