Published On : Sat, Sep 12th, 2020

सकारात्मक विचार ठेवा, घराबाहेर निघणे टाळा!

Advertisement

‘कोव्हिड संवाद’मध्ये डॉ. अभय केळकर यांचे आवाहन

नागपूर: आज कोव्हिडचा विळखा वाढत आहे. वारंवार आवाहन करूनही नागरिक बेजाबदारपणे वागत आहेत. बेजबादार वागणूक आणि जास्त भीती हे दोन्ही कोव्हिडसाठी घातक आहे. मला काही होत नाही, ही भावना सर्वप्रथम मनामधून काढून घ्या. जबाबदारीने वागा, सुरक्षेच्या सर्व नियमांचे पालन करा. आणि यासोबतच अमुक केल्याने कोरोना होईल किंवा एखाद्याच्या संपर्कात आल्याने मला कोरोना झाला. कोरोना झाला तर मी जगू शकणार नाही, अशी भीती मनातून काढून टाका. योग्य काळजी घेतल्याने कोरोनाला दूर ठेवता येउ शकते. त्यामुळे प्रत्येकाने सकारात्मक विचारसरणी बाळगून विनाकारण घराबाहेर निघणे टाळावे, असे आवाहन डॉ. अभय केळकर यांनी केले.

नागपूर महानगरपालिकेचे महापौर संदीप जोशी यांच्या संकल्पनेतून नागपूर महानगरपालिका आणि इंडियन मेडिकल असोशिएनशच्या संयुक्त विद्यमाने होम आयसोलेशनमध्ये असलेल्या कोव्हिड रुग्णांसाठी ‘कोव्हिड संवाद’ या शीर्षकांतर्गत शनिवारी (ता.१२) ‘फेसबुक लाईव्ह’च्या माध्यमातून त्यांनी शहरातील नागरिकांशी संवाद साधला. यावेळी आयएमएच्या उपाध्यक्षा डॉ.गौरी अरोरा उपस्थित होत्या.

‘फेसबुक लाईव्ह’च्या माध्यमातून नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांची यावेळी डॉ. अभय केळकर यांनी उत्तरे देउन शंकांचे निरसरन केले. कोव्हिडचे संकट मोठे आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्याला काहीच होत नाही, अशी भूमिका न ठेवता काळजी घ्यावी. सॅनिटायजर, मास्क, सोशल डिस्टंसिंग या त्रिसूत्रीचा अंगीकार करा. स्वच्छता आणि स्वत:ची योग्य काळजी हाच कोरोनापासून बचावाचा मंत्र आहे, असेही त्यांनी सांगितले.

लक्षणे नसलेली अनेक पॉझिटिव्ह व्यक्ती धोकादायक आहेत. त्यामुळे कोणतिही लक्षणे आढळल्यास तातडीने चाचणी करून घ्या. लक्षणे नसल्याने अनेकांना आपण पॉझिटिव्ह आहोत हे कळत नाही. त्यामुळे प्रत्येकाने मास्क लावणे व योग्य अंतर पाळणे अत्यावश्यक आहे. आपल्या घराशेजारी किंवा आजुबाजुला कुणी पॉझिटिव्ह आले असल्यास त्यांचा तिरस्कार करू नका. कोरोना वा-यातून पसरत नाही. पॉझिटिव्ह व्यक्तींविषयी सहानुभूती बाळगा, त्यांना हवे ते सहकार्य करा, असेही आवाहन डॉ. अभय केळकर यांनी केले.