Published On : Fri, Oct 2nd, 2020

सुदृढ आरोग्यासाठी व्यायाम करत राहा!

– ‘कोव्हिड संवाद’मध्ये डॉ.प्रशांत राठी आणि डॉ.अमोल कडू यांचा सल्ला

नागपूर : कोरोना विरुद्ध लढण्यासाठी प्रतिकारशक्ती वाढविणे आवश्यक आहे. त्यासाठी संतुलीत आहार आणि नियमित व्यायाम गरजेचे आहे. मात्र कोरोनाच्या या काळात अनेकांनी हालचालच बंद केली आहे. त्यामुळे वात, संधीवात, जोडांमधील दुखणे असे आजार उद्भवत आहेत. ‘लॉकडाउन’, ‘आयसोलेशन’ आणि ‘वर्क फ्रॉम होम’ यामुळे जीवनशैलीच बदलली आहे. एका जागेवर बसून राहणे, बसूनच काम करणे अशा सवयी वाढल्या, शरीराची हालचाल खूप कमी झाली यामुळे हाडांचे आजार उद्भवत आहेत. कोरोनापासून बचाव करताना आपण इतर आजारांना आमंत्रण देतोय, असे होउ नये यासाठी शरीराची हालचाल कायम ठेवा, सुदृढ आणि निरोगी आरोग्यासाठी नियमित व्यायाम करा, असा सल्ला ऑर्थोपेडिक सर्जन डॉ.प्रशांत राठी आणि कनसल्टंट जॉईंट रिप्लेसमेंट अँड ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. अमोल कडू यांनी दिला.

नागपूर महानगरपालिका आणि इंडियन मेडिकल असोशिएशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महापौर संदीप जोशी यांच्या संकल्पनेतील ‘कोव्हिड संवाद’ फेसबुक लाईव्ह कार्यक्रमात गुरूवारी (ता.१) डॉ.प्रशांत राठी (ऑर्थोपेडिक सर्जन, राठी हॉस्पिटल) आणि डॉ. अमोल कडू (कनसल्टंट जॉईंट रिप्लेसमेंट अँड ऑर्थोपेडिक सर्जन) यांनी ‘कोव्हिड आणि संधिवात’ या विषयावर मार्गदर्शन केले व नागरिकांच्या प्रश्नांची उत्तरे देत त्यांच्या शंकांचे निरसरन केले.

आज प्रत्येकाच्या मनात कोव्हिडची भीती आहे. या भीतीपोटी अनेक जण जोडांमधील दुखणे, संधीवात किंवा अन्य कोणतेही त्रास असले तरी दवाखान्यांमध्ये जाण्याचे टाळतात. ही गंभीर बाब आहे. दुखणे सहन करीत राहिल्यास आणि योग्यवेळी उपचार न केल्यास त्याचे गंभीर परिणाम आपल्यालाच सहन करावे लागतात. आज सर्वच हॉस्पिटलमध्ये आवश्यक ती सर्व काळजी घेउनच उपचार केले जाते. त्यामुळे आता हॉस्पिटल हे सुरक्षित ठिकाण आहे. कुणलाही त्रास असल्यास तो अंगावर काढत बसण्यापेक्षा किंवा स्वत:च्या मताने, इंटनेटवर पाहून उपचार करीत बसून धोका वाढविण्यापेक्षा डॉक्टरांचा सल्ला घ्या. विशेष म्हणजे, ज्यांना संधीवात वा संबंधित अन्य आजार असतील त्यांनी कोव्हिडच्या भीतीपोटी आपली औषधी घेणे बंद करू नये, असाही मौलिक सल्ला यावेळी डॉ.प्रशांत राठी आणि डॉ. अमोल कडू यांनी दिला.

आज एखाद्याला आजार असेल किंवा कुणी कोव्हिड बाधित असेल त्यांनाच काळजी घेण्याची गरज नसून सर्वांनाच आपल्या सुदृढ आणि निरोगी आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे. कोरोनाच्या काळात अनेकांचे सकाळी फिरणे बंद झाले आहे. ही चुकीची बाब आहे. रनींग करा, सायकलिंग करा यामुळे आपल्या स्नायूंचा व्यायाम होतो, कोरोनामुळे रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताच्या गाठी होण्याचे प्रमाण वाढत आहे, यामुळे त्यापासून बचाव करता येईल. धावताना किंवा सायकल चालविताना कुणाही व्यक्तीच्या संपर्कात येणार नाही, योग्य अंतर राखले जाईल याची विशेष काळजी घ्या. धावत असताना किंवा सायकल चालविताना मास्क लावू नका, त्यामुळे आपण इतरांच्या संपर्कात येणार नाही,याची काळजी घेणे गरजेचे आहे. गर्दीत जाणे टाळा, बाहेर कुठेही किंवा रुग्णालयात तपासणीसाठी जाण्याची वेळ आल्यास मास्क अवश्य वापरा, शारीरिक अंतर राखा. सुरक्षेच्या सर्व नियमांचे पालन करणे हे आपले कर्तव्य आहे आणि प्रत्येकाने आपले कर्तव्य बजावा. मानसिक आणि भावनिकदृष्ट्या फिट राहायचे असेल तर नियमित व्यायाम करा. कोव्हिडविषयी कुठलेही गैरसमज बाळगू नका, पसरवू नका आणि इतरांनाही गैरसमज पसरवू देउ नका, असा संदेश डॉ.प्रशांत राठी आणि डॉ. अमोल कडू यांनी यावेळी दिला.