नागपूर: पावसाळ्यापूर्वी महानगरपालिकेची आपात्कालिन यंत्रणा सज्ज करा, आवश्य़क असलेल्या यंत्रसामुग्रीची व्यवस्था करा, पावसाळ्यात नागरिकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्या. आपल्या कर्तव्यात कुठलीही हयगय करु नका, अशा सूचना महापौर नंदा जिचकार यांनी केल्या.
बुधवारी मनपा मुख्यालयात पावसाळ्यापूर्वीच्या नियोजनाचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. याप्रसंगी उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती संदीप जाधव, सत्तापक्षनेते संदीप जोशी, मनपा आय़ुक्त अश्विन मुदगल, स्थापत्य व प्रकल्प विशेष समिती सभापती संजय बंगाले, आरोग्य समिती सभापती मनोज चापले, ज्येष्ठ नगरसेवक नरेंद्र (बाल्या) बोरकर, अपर आयुक्त डॉ. रामनाथ सोनवणे, आर. झेड. सिद्दिकी, रवींद्र कुंभारे, अतिरिक्त उपायुक्त जयंत दांडेगावकर, मुख्य अभियंता उल्हास देबडवार, अधीक्षक अभियंता दीपक सोनटक्के, दिलीप जामगडे, प्रमुख अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांच्यासह सर्व झोनचे कार्यकारी अभियंता, सर्व झोनचे सहायक आय़ुक्त, आरोग्य झोनल अधिकारी (स्वच्छता), उपअभियंता, आणि अन्य अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
शहरातील नदी, नाल्यांच्या सफाईचा झोननिहाय आढावा महापौरांनी घेतला. शहरातील विविध ठिकाणी पावसाळी नाल्यांच्या स्वच्छतेचा झोननिहाय आढावा यावेळी आयुक्तांनी घेतला. नदी-नाले आणि पावसाळी नाल्यांचा सादर करण्यात आलेला अहवाल सहायक आय़ुक्तांनी प्रमाणित करावा, याची पाहणी विविध पदाधिकारी कऱणार असल्याचे सत्तापक्षनेते संदीप जोशी यांनी सांगितले. शहरातील सीमेंट रोडची उंची वाढली असल्याने नागरिकांच्या घरात पाणी जाईल याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे सीमेंट रस्त्याचे काम करणारे कंत्राटदार आणि मनपाच्या यंत्रणेने सज्ज राहावे, असे निर्देश यावेळी महापौरांनी दिले. अधिकाऱ्यांनी आपल्या जबाबदाऱ्या ओळखाव्या. पावसाळी नाल्यांच्या सफाईची टाईमलाईन संपलेली आहे. जी-जी कामे शिल्लक आहेत ती कामे पुढील सात दिवसांत पूर्ण करा. कामात दिरंगाई झाली तर संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही महापौर जिचकार यांनी दिला.
पावसाळ्यामुळे शहरात आपातकालीन स्थिती निर्माण झाल्यास झोननिहाय बचाव पथकांचे गठन आणि त्यांचे संपर्क क्रमांक नगरसेवकांना देण्यात यावे. पावसाळ्यात पथदिवे बंद पडल्य़ास पर्यायी व्यवस्था निर्माण करावी असे निर्देशही महापौर नंदा जिचकार यांनी दिले. आरोग्य विभागाने पावसाळ्यात साथीचे रोग पसरणार नाही, याची काळजी घ्यावी आणि आवश्यक औषध पुरवठा आणि लसींची व्यवस्था करावी, अशा सूचनाही त्यांनी केल्या.
