Published On : Fri, Jun 12th, 2020

दोन दशकांनंतरही काटोल संत्रा प्रकल्पाची दुरवस्था कायम!

– माजी आमदार सुनील शिंदे यांच्या पुढाकाराने झाली होती उभारणी
– संत्रा उत्पादक व रोजगाराचा प्रश्न मांडणारा नेता हरपल्याची नागरिकांची भावना

नागपूर : काटोल व नरखेड तालुक्यात पिकणाऱ्या संत्र्यावर प्रक्रिया करून तत्सम पदार्थ तयार करणे आणि स्थानिक युवकांना रोजगार देण्याच्या हेतूने २५ वर्षांपूर्वी सुरू झालेला डोंगरगाव येथील संत्रा प्रक्रिया प्रकल्प कायम उपेक्षेचा बळी ठरला. माजी आमदार सुनील शिंदे यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या मागणीनुसार उभारण्यात आलेल्या या प्रकल्पाची दुरवस्था पुन्हा एकदा सर्वांच्या डोळ्यांसमोर तरळली अन् हजारो शेतकरी आणि बेरोजगारांच्या स्वप्नभंगाच्या वेदना ताज्या झाल्या. माजी आमदार सुनील शिंदे यांनी नागपूर येथील अधिवेशनात या प्रश्नाकडे वेळोवेळी राज्य शासनाचे लक्ष वेधले. पण, त्यांच्या अचानक निधनाने काटोल येथील संत्रा प्रकल्प आणि रोजगाराचा प्रश्न आता कायमचा हद्दपार होणार काय, अशी चिंता अनेकांकडून व्यक्त केली जात आहे.

१९९२ मध्ये संत्राबेल्ट असलेल्या काटोल भागात झालेल्या गारपिटीमुहे संत्रा उत्पादकांचे मोठे नुकसान झाले. तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी नुकसानाची दखल घेत तब्बल ३० कोटी रुपयांची भरपाई संत्रा उत्पादकांसाठी मंजूर केली. तत्कालीन आमदार सुनील शिंदे यांनी संत्रा उत्पादकांना वैयक्तिक मदत देण्याऐवजी या निधीतून संत्रा प्रक्रिया उद्योग उभारला जावा, यासाठी पाठपुरावा केला. शेतकऱ्यांनीही या मागणीला दुजोरा दिला. त्याची दखल घेत तत्कालीन राज्य सरकारने काटोल तालुक्यातील डोंगरगाव एमआयडीसीमध्ये १९९५ मध्ये १७ एकरांत हा प्रकल्प उभारला. १९९७ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन झाले. तीन वर्षे हा प्रकल्प सुरळीत सुरू होता. पण, त्यानंतर बंद पडला तो कायमचाच! दरम्यानच्या काळात अनेक खासगी कंपन्यांना हा प्रकल्प हस्तांतरित करण्यात आला. २०१६ मध्ये पतंजलीच्या पुढाकाराने हा प्रकल्प पुनर्जीवित करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले. या माध्यमातून अमरावती आणि नागपूर येथील संत्रा उत्पादकांना भाव मिळणार असून, १० हजार स्थानिक युवकांना रोजगार देणार असल्याच्या वावड्या उडविण्यात आल्या. मात्र, पुन्हा स्थानिकांची घोर निराशा झाली.

शेतकऱ्यांचा हिरमोड :

काटोल, कळमेश्वर, सावनेर, वरुड, मोर्शी, कारंजा या भागात मोठ्या प्रमाणात संत्रा उत्पादन होते. या परिसरात एकही शीतगृह नसल्याने शेतकऱ्यांना आल्या भावात संत्रा विकावा लागतो. चांगल्या दर्जाचा संत्रा विकल्यानंतर बारीक संत्र्याला बाजारात भाव मिळत नाही. त्यामुळे बारीक संत्र्यावर प्रक्रिया करून काही पदार्थ तयार केल्यास संत्र्यालाही भाव मिळू शकतो. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते. पण, काटोलचा प्रक्रिया उद्योग बंद पडल्याने संकट निर्माण झाले आहे.

बेरोजगारांचे स्वप्नभंग :

जेव्हा हा संत्रा प्रक्रिया प्रकल्प निर्माणाधीन होता, तेव्हा रोजगाराबाबत स्थानिक युवकांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. संत्रा उत्पादनाला भाव आणि स्थानिकांना रोजगार मिळणार या अपेक्षेत परिसरातील नागरिक होते. परंतु, कोट्यवधी खर्च करून उभारण्यात आलेला हा प्रकल्प पांढरा हत्ती ठरला. या प्रकल्पाकडे राज्य शासनाने लक्ष दिले तर अजूनही मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करण्याची क्षमता या प्रकल्पात आहे.

संत्रा उत्पादकांच्या समस्यांकडे आता कोण लक्ष देणार?

संत्र्याला भाव तसेच युवकांना रोजगार देण्यासंदर्भात दरवर्षी हिवाळी अधिवेशनात माजी आमदार सुनील शिंदे लक्षवेधी आंदोलने करायचे. काटोल संत्रा प्रक्रिया प्रकल्पाबाबत सुनील शिंदे यांनी नेहमी पुढाकार घेतला. आता संत्रा उत्पादक शेतकरी आणि युवकांच्या भवितव्याचा प्रश्न शासनासमोर कोण मांडणार, असा प्रश्न स्थानिक नागरिक करीत आहेत.

जीवन अंबुडरे