Published On : Wed, May 29th, 2019

कर्तव्यदक्ष चालक आणि वाहकाचा मनपातर्फे सन्मान

आपली बसला आग : प्रसंगावधानाने वाचविला १५ प्रवाशांचा जीव

नागपूर: हिंगणा मार्गावरील बालाजीनगर येथे मंगळवारी (ता.२८) आपली बसला लागलेल्या आगीमध्ये प्रसंगावधान दाखवून सुमारे १५ प्रवाशांचा जीव वाचविणा-या कर्तव्यदक्ष चालक आणि वाहकाचा बुधवारी (ता.२९) नागपूर महानगरपालिकेतर्फे सत्कार करण्यात आला. मनपाचे परिवहन समिती सभापती जितेंद्र (बंटी) कुकडे यांच्या हस्ते आपली बसचे चालक मनिष करांगळे व वाहक अमित किटुकले यांना शाल, पुष्पगुच्छ, श्रीफळ व रोख पुरस्कार देउन सन्मानित करण्यात आले.

यावेळी परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप, प्रशासकीय अधिकारी रवींद्र पागे, श्रम अधिकारी अरुण पिपरूडे, यांत्रिकी अभियंता प्रभव बोकारे, बस ऑपरेटरचे प्रतिनिधी निलमणी गुप्ता, आर.के.साटी, स्मार्ट सिटी बस ऑपरेटर श्री. पारेख, डिम्स कंपनीचे सतीश सदावर्ते उपस्थित होते.

मंगळवारी (ता.२८) ऑरेंटस्ट्रिट डेपोमधील मे. हंसासिटी बस सर्व्हीसेस प्रा.लि. नागपूरतर्फे संचालन करण्यात येत असलेली बस क्रमांक एम.एच.३१ सी.ए.६२४५ ही बस ड्युटी क्रमांक १३५/ए वर हिंगणा ग्रामिण दवाखाना ते बर्डी मार्गावर सेवा देत होती. हिंगणा मार्गावरील बालाजीनगर महिंद्रा कंपनीजवळ सकाळी ६.२० वाजता दरम्यान शार्ट सर्कीटमुळे अचानक बसने पेट घेतला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता प्रसंगावधान दाखवून चालक मनिष करांगळे (आयडी क्र. ३०४६९) यांनी लगेच बस रस्त्याच्या बाजुला उभी केली व वाहक अमित किटुकले (आयडी क्र. ९०१५८) यांच्या मदतीने बसमधील अंदाजे १५ प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. यानंतर लगेच त्यांनी एमआयडीसी नागपूर शहर पोलिस स्टेशन व अग्निशमन विभागाला तात्काळ माहिती दिली.

या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत परिवहन समिती सभापती जितेंद्र (बंटी) कुकडे यांनी शहर बस वाहतूक करणारे सर्व ऑपरेटर व डेपो यांनी सर्व गाड्यांची तात्काळ तपासणी करून वायरींग सिस्टीम दुरूस्त करून घेणे व दुरूस्त झाल्याची खात्री करून त्यासंबंधी अहवाल विभागाला पाठविण्याचे निर्देश दिले.

मनपा कर्मचा-यांचे बनणार परिवार आरोग्य अभियान कार्ड
आपली बसच्या प्रकरणानंतर मनपामध्ये सेवा देणारे चालक, वाहक व इतर कर्मचारी आणि त्यांच्या परिवाराच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या सर्वांच्या आरोग्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने मनपातर्फे महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून त्या अंतर्गत मनपातील शहर बसचे चालक, वाहक व इतर कर्मचारी आणि त्यांच्या परिवाराचे महात्मा गांधी परिवार आरोग्य अभियान कार्ड काढण्यात येणार असल्याची माहिती परिवहन समिती सभापती जितेंद्र (बंटी) कुकडे यांनी यावेळी दिली. यासंबंधीची कार्यवाही लवकरच पूर्ण करण्यात येणार असून सर्व चालक, वाहक व इतर कर्मचा-यांनी स्वत:सह परिवाराचे आरोग्य कार्ड काढण्याचे आवाहनही परिवहन समिती सभापती जितेंद्र (बंटी) कुकडे यांनी केले.