Published On : Thu, Jun 27th, 2019

कन्हानमधून बोगद्याद्वारे 10 टीएमसी पाणी तोतलाडोह जलाशयात वळवणार

Advertisement

– मुख्यमंत्री फडणवीस यांचा सकारात्मक निर्णय
– 2864 कोटींच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाची मान्यता
– पालकमंत्री बावनकुळे व आमदारांच्या प्रयत्नांना यश
– पाच वर्षात प्रकल्प पूर्ण होणार, 1 लाख हेक्टर सिंचन

मुंबई: मध्यप्रदेशातील चौराई धरणामुळे महाराष्ट्रातील पेंच प्रकल्पासंबंधात निर्माण झालेल्या गंभीर पाणीटंचाई परिस्थितीवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी जलसंपदा विभागातर्फे मध्यप्रदेशातील लोहघोगरी गावाजवळून कन्हान नदीतून बोगद्याद्वारे 10 टीएमसी पाणी तोतलाडोह जलाशयात वळवण्याच्या 2864 कोटीच्या प्रस्तावाला आज मंत्रिमंडळाने मान्यता दिली. भंडारा-नागपूर परिसरातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारा हा निर्णय असून नागपूर शहराची पिण्याच्या पाण्याची समस्या कायमस्वरूपी निकाली निघणार आहे.

नागपूरच्या इतिहासात राज्य मंत्रिमंडळाने घेतलेला हा एक महत्वपूर्ण व ऐतिहासिक निर्णय असून एवढा मोठा निर्णय यापूर्वी झाला नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर, भंडारा परिसरातील शेतकऱ्यांची व नागरिकांची मागणी व भावना लक्षात घेता सकारात्मक भूमिका घेऊन या निर्णयाला मान्यता दिली. दरम्यान शेतकरी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनाही भेटले. त्यांच्याकडेही शेतकऱ्यांनी पाणी टंचाईबद्दल व सिंचनाबद्दल चिंता व्यक्त केली होती. गडकरी यांनीही या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून योग्य निर्णय घेण्याची सूचना केली होती. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व या भागातील आमदारांनी दीर्घ काळापासून पाणी टंचाई व सिंचनावर तात‍डीने योग्य उपाय योजना करण्याची मागणी केली होती. चौराई धोरणामुळे पेंच नदीवरील तोतलाडोह धरणात येणारे पाणी येणे कमी झाले आहे. सन 2016-17 मध्ये चौराई बांधण्यात आले. तेव्हापासून नागपूर व भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पाणी मिळेनासे झाले व नागपूर शहराला पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली होती.

चौराई धरणामुळे महाराष्ट्राच्या वाट्याला येणारे 614 दलघमी पाण्यात घट झाली. 1964 च्या पाणी वापरासाठी करण्यात आलेल्या आंतरराज्यीय पाणी वापर करारानुसार मागील 40 वर्षात महराष्ट्राला 1840 दलघमी पाणी मिळवयास हवे होते. ते फक्त 1294 दलघमी मिळाले. चौराई धरण होईपर्यंत गेल्या 25 वर्षापासून नागपूर जिल्ह्यातील तोतलाडोह धरणात येणाऱ्या सर्व पाण्याचा वापर होत होता. त्यातून नागपूर शहरासाठी पाणीपुरवठा योजना व सिंचनासाठी मुबलक पाणी उपलब्ध होते. पण आता त्यात 614 दशलक्ष घनमीटरची तूट निर्माण झाली आहे.

चौराई धरण मध्यप्रदेशात बांधण्यात आल्यामुळे पूर्वी प्राप्त होणाऱ्या 42.7 टीएमसी पैकी फक्त 27 टीएमसी पाणी महाराष्ट्राचा तोतलाडोह येथे उपलब्ध होत होते. ही तफावत भरुन काढण्यासाठी 25-10-2016 अन्वये गठित समितीच्या शिफारशीनुसार व शेतकऱ्यांच्या तीव्र भावना व मागणीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर पाणी टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी कमी कालावधी व दीर्घ कालावधीत पूर्ण होऊ शकणाऱ्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले
गेल्या 30 मे 2019 च्या शासन निर्णयानुसार मंजूर योजनांची कामे पूर्ण झाल्यानंतर 118 दलघमी पाण्याची तूट भरुन निघणे अपेक्षित आहे. पण नागपूर शहराची 2025 पर्यंत लोकसंख्येतील वाढ लक्षात घेता पिण्याच्या पाण्याची मागणी 250 ते 300 दलघमी होणे अपेक्षित आहे. त्यामुळे मंजूर उपाययोजना पूर्ण झाल्यानंतरही मनपाच्या पिण्याच्या पाण्याची आवश्यकता व 104000 हेक्टर सिंचन होणे कठीण होते.

नागपूर जवळील जामघाट प्रकल्प आर्थिकदृष्टया व मोठया प्रमाणात लागणाऱ्या वन जमिनीमुळे अव्यवहार्य असल्यामुळे लोहघोगरी गावाजवळ वळण बंधारा बांधून बोगद्याद्वारे कन्हान नदीचे पाणी तोतलाडोह धरणात वळवण्यात येणार आहे. या बंधाऱ्याची लांबी 160 मीटर राहणार आहे. बंधाऱ्याची उंची 5.5 मीटर तर बोगद्याची लांबी 62 किमी राहणार आहे. या बोगद्याचा व्यास 6.9 मीटर तर 12.26 हेक्टर वनजमिनी यासाठी लागणार असून 10 टीएमसी पाणी वळवण्यात येणार आहे. या प्रकल्पाला 2864 कोटी रुपये खर्च येईल.

बोगद्याद्वारे तोतलाडोह मध्ये पाणी आणण्याच्या प्रकल्पाला सन 2019-20 मध्ये 586 कोटी सन 20-21 मध्ये 575 कोटी, 2021-22 मध्ये 574 कोटी सन 2022-23 मध्ये 574 कोटी व सन 2023-24 मध्ये 554 कोटी रुपये मिळून 2864 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.
पेंच प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रात झालेली घट भरुन निघण्यास या प्रकल्पामुळे मदत होईल. पिण्याचे पाणी, वीज निर्मितीकरिता लागणारे पाणी तसेच सिंचनाकरिता आवश्यक पाणी महाराष्ट्राला उपलब्ध होईल. तसेच तोतलाडोह येथे कार्या‍न्वित असलेले जलविद्दुत प्रकल्पातून सरासरी 95 दशलक्ष युनिट वीज अधिक निर्माण होईल, हे येथे उल्लेखनीय.