नागपूर : नागपूर ग्रामीण पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने (एनडीपीएस) कन्हान परिसरात मोठी कारवाई करत नशायुक्त ट्रामाडॉल गोळ्यांचा अवैध साठा जप्त केला. मंगळवारी उशिरा रात्री गुप्त माहितीच्या आधारे कन्हान-रामटेक मार्गावरील आणि कन्हान नदी परिसरातील एका ठिकाणी छापा टाकण्यात आला.
कारवाईदरम्यान एका संशयिताच्या घरातून मोठ्या प्रमाणात नशायुक्त गोळ्या जप्त करण्यात आल्या. प्राथमिक माहितीनुसार, या जप्त मालाची किंमत लाखो रुपयांच्या घरात असून, या प्रकरणात संबंधित संशयितांची सखोल चौकशी सुरू आहे.
तपास यंत्रणा या गोळ्यांचा पुरवठा कुठून झाला, त्यामागील मुख्य सूत्रधार कोण आहेत, हा साठा कोणत्या भागात पाठविण्यात येणार होता आणि या अवैध रॅकेटमध्ये आणखी किती जणांचा सहभाग आहे, याचा शोध घेत आहे. तपासाच्या हितासाठी अधिकृत माहिती अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.
दरम्यान, नागपूर शहर व ग्रामीण भागातील अमली पदार्थांच्या अवैध व्यापारावर आळा घालण्यासाठी पोलिसांनी सुरू केलेल्या ‘ऑपरेशन थंडर’ मोहिमेंतर्गत ही कारवाई महत्त्वाची मानली जात असून, पुढील काही दिवसांत अशाच धडक मोहिमा सुरू राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत.





