Published On : Tue, Jul 21st, 2020

नाल्यात वाहुन गेलेल्या मुलाचा अद्यापही शोध सुरु

नागपूर : कळमना परिसरातील गुलमोहर नगरातील नाल्यात वाहून गेलेल्या दहा वर्षीय मुलाचा नागपूर महानगरपालिकेचे अग्निशमन विभागाचे पथक बोटीच्या सहाय्याने आज दि २० जूलै (सोमवार) रोजी देखील शोध घेत आहेत. अग्निशमन विभागाचे मुख्य अग्निशमन अधिकारी श्री.राजेन्द्र उचके यांनी सांगितले की, विभागाची चमू दोन बोटींच्या सहाय्याने सोमवारी सकाळपासून या मुलाचा सातत्याने शोध घेत आहेत.

दि. १९ जूलै (रविवार) रोजी दुपारी एक १० वर्षाचा मुलगा नेहल शेखर मेश्राम गुलमोहर नगरातील सिमेंट पोलवरुन पाय घसरुन वाहून गेला. पाण्याचा वेग जास्त असल्याने तो क्षणात दिसेनासा झाला.

गुलमोहरनगर परिसरातील नाला पुढे पीली नदीला जाऊन मिळतो. पीली व नाग नदीला जोडणारा हा नाला असल्यामुळे तीन ते चार किमी पर्यंत नेहलचा अद्यापही शोध घेणे सुरुच आहे.

कळमना, गंजीपेठ आणि सक्करदरा अग्निशमन केन्द्राचे जवान रविवारपासून मुलाचा शोध पिली नदी व नाग नदीच्या संगमपर्यंत घेत होते. रविवारी या मुलाचा ठाव-ठिकाणा न मिळाल्याने व रात्र झाल्याने शोधकार्य थांबवावे लागले. सोमवारी हया चमूंनी पवनगांव, महालगांव – भंडारा पूल, जबलपुर राष्ट्रीय महामार्ग पर्यंत नदीपात्रात शोध घेतला. परंतु दुर्देवाने त्याचा शोध अद्यापही लागलेला नाही.

या शोध कार्यात अग्निशमन विभागाचे सब ऑफीसर शौकत अली, ज्ञानेश्वर मोहूतूरे, फायरमन राजू पवार, शरद न्यूमंड, योगेश खोडके, पुंडलीक मोहूर्ले, शिवचरण यादव, ड्रायवर सर्वश्री. अकलिम शेख, मंगेश राणे, ज्ञानेश्वर डोंगे, संदीप देशमूख, धनराज बावणे इत्यादी सहभागी आहेत.