नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील रामटेक तालुक्यातील कांद्री सीमा तपासणी नाक्यावर सोमवारी ट्रकचालकांनी जोरदार गोंधळ घातला. वजनकाट्यावर ट्रक न नेता पुढे जाण्याच्या प्रयत्नातून सुरू झालेला वाद चांगलाच चिघळला. चौकीदाराने मारहाण केल्याचा आरोप करीत शेकडो ट्रकचालक रस्त्यावर उतरले आणि रास्ता रोको सुरू केला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अखेर पोलिसांना लाठीमार करावा लागला. या घटनेत तीन ट्रकचालकांना अटक करण्यात आली असून, तब्बल तीन तास महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, कांद्री येथील राज्य सीमा तपासणी नाक्यालगत खासगी कंपनीचा वजनकाटा आहे. या वजनकाट्यावर वाहनांचे वजन करून त्याची पावती आरटीओ तपासणी नाक्यावर दाखवणे आवश्यक आहे.
सोमवारी दुपारी सुमारे चार वाजताच्या दरम्यान नूर मोहम्मद इशा मोहम्मद या ट्रकचालकाने वजनकाट्यावर न जाता ट्रक थेट पुढे नेण्याचा प्रयत्न केला. यावेळी चौकीदाराने ट्रक अडवून बॅरिकेड्स लावले. मात्र, चौकीदाराने दगड मारल्याचा आरोप संबंधित चालकाने केला. या घटनेनंतर इतर ट्रकचालकही आक्रमक झाले आणि चौकीदाराने माफी मागावी, या मागणीसाठी त्यांनी महामार्गावर रास्ता रोको सुरू केला.
परिणामी महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी रामटेकचे उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते, ठाणेदार राजेशकुमार थोरात, देवलापारचे ठाणेदार नारायण तुरकुंडे, पारशिवनीचे ठाणेदार किशोर शेरकी यांच्यासह विविध पोलीस पथके आणि महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी वारंवार समजूत घालूनही आंदोलक चालक रस्ता मोकळा करण्यास तयार नसल्याने अखेर पोलिसांनी लाठीमार केला. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. या प्रकरणी नूर मोहम्मद इशा मोहम्मद, शकील आश मोहम्मद खान आणि शहाबुद्दीन हिना खान या तीन ट्रकचालकांना अटक करण्यात आली आहे.
रुग्णवाहिका आणि प्रवासी बसही अडकल्या!
या रास्ता रोकोचा फटका केवळ मालवाहू वाहनांनाच नव्हे, तर रुग्णवाहिका, प्रवासी बस आणि इतर वाहनांनाही बसला. रुग्ण आणि प्रवाशांची गैरसोय होत असल्याने वाहतूक सुरळीत करण्यासाठी कारवाई करावी लागल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते यांनी स्पष्ट केले.
वाहनचालकांचा वजनकाट्याच्या कारभारावर आरोप!
दरम्यान, कांद्री येथील खासगी कंपनीचा वजनकाटा वारंवार बंद पडतो. तसेच चौकीदारांकडून वाहनांच्या रांगेचे योग्य नियोजन होत नसल्याने वारंवार वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो, असा आरोप रास्ता रोको करणाऱ्या ट्रकचालकांनी माध्यमांशी बोलताना केला.
एकीकडे वजनकाट्याच्या व्यवस्थापनावर ट्रकचालकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे, तर दुसरीकडे महामार्ग अडवून सर्वसामान्य प्रवाशांना वेठीस धरण्याच्या प्रकारावर पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यामुळे कांद्री नाक्यावरील वजनकाट्याची व्यवस्था सुधारणार का आणि भविष्यात अशा वाहतूक कोंडीला आळा बसणार का, हा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
प्रतिनिधी अजय मेहरकुळे रामटेक




