नागपूर – नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या आवंढी गावाजवळ राष्ट्रीय महामार्गावर मध्यरात्रीच्या सुमारास एक दुर्दैवी अपघात घडला. गिट्टीने भरलेला ट्रक चालकाचा ताबा सुटल्याने थेट डिव्हायडरला जाऊन आदळला. या अपघातात ट्रकमध्ये बसलेले तीन मजूर गंभीर जखमी झाले असून, त्यातील एका मजुराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
मृत मजुराची ओळख देवलापार येथील हंसराज बीरू इवानते (वय ३०) अशी झाली आहे. इतर दोन जखमींमध्ये राहुल उईके (वय २०) आणि मंगेश उईके (वय २४) यांचा समावेश आहे.
हा अपघात घडला तेव्हा स्थानिक ग्रामस्थांनी तात्काळ मदत करत जखमींना रुग्णालयात दाखल केले.यानंतर डॉक्टरांनी तपासल्यानंतर एका मजुराचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ट्रक चालक मनीष उईके हा सहा चाकी टाटा ट्रकवर गिट्टी घेऊन जात असताना अतिवेगाने आणि निष्काळजीपणाने वाहन चालवत होता. त्यामुळे ट्रकचा ताबा सुटून तो डिव्हायडरवर आदळला.
या प्रकरणी नवीन कामठी पोलिसांनी मनीष उईकेविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.