Published On : Fri, Jul 13th, 2018

कांबळे दुहेरी हत्याकांड प्रकरण: मुख्यमंत्र्यांनी कारवाईचे दिले आश्वासन

Advertisement

नागपूर : बहुचर्चित कांबळे दुहेरी हत्याकांडप्रकरणी सहायक पोलिस आयुक्त किशोर सुपारे यांनी योग्य तपास न करता आरोपीला वाचविण्याचा सर्वोतोपरी पर्यंत केल्याचा आरोप पिडीत कांबळे कुटुंबीयांनी केला आहे. त्यामुळे याप्रकरणी एसीपी सुपारे यांना सह आरोपी करण्यात यावे, अशी मागणी पिडीत पत्रकार रविकांत कांबळे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांना कायदेशीर कारवाईचे आश्वासन दिले.

फिर्यादी पत्रकार रविकांत कांबळे यांनी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. १७ पेâब्रुवारी २०१८ रोजी हुडकेश्वर हद्दीतील दिघोरी येथे रविकांत कांबळे यांच्या आई व दिड वर्षाच्या मुलीची वस्तीतीलच शाहु कुटुंबीयांनी आपल्या घरात धारदार शस्र्त्राने गळा चिरुन निर्घृणपणे हत्या केली होती.

याप्रकरणी पोलिसांनी शाहु कुटुंबातील चार जणांना अटक केली. नमुद हत्याकांड अतिशय सुड बुद्धीने व कट रचुन थंड डोक्याने करण्यात आलेले आहे. ज्यात एका महिलेसह चारही आरोपींचा सहभाग प्रथम दर्शनी पोलिस तपासात निष्पण्ण झाला आहे. तशी माहिती तत्कालीन एसीपी सुपारे यांनी दिली होती. मात्र नंतर सुपारे यांची भुमिका बदलली. त्यांनी आरोपीला वाचविता कसे येईल, त्यादृष्टीने प्रकरण हातळण्यास सुरुवात केली. तर कांबळे कुटुंबीयांनी त्यांच्यावर थेट आरोपींशी संगणमत करुन त्यांना वाचविण्याचा आरोप लावून सुपारे यांना सहआरोपी करण्याची मागणी पोलिस आयुक्तांकडे केली.

यात हत्याकांड प्रकरणी प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांची हकालपट्टी करणे, सीसीटीव्ही पुâटेज जप्त न करणे, प्रमुख जप्ती न करणे, आरोपीला मदत होईल, असे न्यायालयात दिशाभुल करणारे रिमांड पेपर्स दाखल करणे, न्यायालयात स्वत: उभे राहुन आरोपी निर्दोष असल्याचे विधान केले होते. तसेच यापूर्वी लकडगंजमध्ये कार्यरत असतांना एसीपी सुपारे यांच्याविरुद्ध अ‍ॅट्रासिटीचे आरोप झाले होते.

यासर्व गंभीर बाबी समोर येताच पोलिस आयुक्तांनी कांबळे दुहेरी हत्याकांड प्रकरणाचा तपास त्यांच्याकडून काढून घेतला. परंतु सुपारे यांनी केलेल्या अतिशय गंभीर अपराध व पदाचा दुरउपयोग, पुरावे नष्ट होतील, असा प्रयत्न बघता त्यांच्याविरुद्ध निलंबनासह सह आरोपी करण्याची कारवाई होणे आवश्यक असल्याचे कांबळे कुटुंबीयांनी आपल्या तक्रारीत वारंवार नमुद केले आहे.

मात्र पोलिस आयुक्तालयाकडून एसीपी सुपारे यांच्याविरुद्ध कारवाईस होत असलेली टाळाटाळ बघता आज पिडीत पत्रकार रविकांत कांबळे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी चौकशीअंती कारवाईचे आश्वासन दिले.