Published On : Tue, Jan 4th, 2022

स्पर्धा परीक्षेत यशासाठी किमान संदर्भपुस्तके अभ्यासून कमाल सराव करा

Advertisement

सहायक पोलीस निरीक्षक सुकेशिनी लोखंडे यांचा युवक-युवतींना मूलमंत्र
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त स्वयम् संस्थेतर्फे ऑनलाईन मार्गदर्शन

नागपूर: शासकीय भरती प्रक्रियेत निवड होण्यासाठी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि शारीरिक क्षमता हे तीन घटक महत्त्वाचे असतात. बारावी उत्तीर्ण असल्यास राज्य शासनाच्या पोलीस विभागामध्ये, तर पदवीच्या पात्रतेवर यूपीएससीच्या माध्यमातून प्रथम श्रेणी अधिकारी होता येते. या परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी किमान दर्जेदार संदर्भपुस्तके अभ्यासून कमाल सराव करण्याचा मूलमंत्र सहायक पोलीस निरीक्षक सुकेशिनी लोखंडे यांनी युवक-युवतींना दिला. सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त स्वयम् सामाजिक संस्था व माय करिअरतर्फे सोमवारी (ता. ३) आयोजित पोलीस भरती व स्पर्धा परीक्षा ऑनलाईन मार्गदर्शन कार्यशाळेत त्या बोलत होत्या. यावेळी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक विक्रम आकरे, मैदानी चाचणी प्रशिक्षक भरत सूर्यवंशी व वरिष्ठ पत्रकार अनिल कांबळे उपस्थित होते.

सुकेशिनी लोखंडे म्हणाल्या, मूलभूत माहिती असणाऱ्या पुस्तकांतून अभ्यास करावा. अभ्यासक्रम समजून घेऊन प्रत्येक घटकाचा तीनदा सराव करण्याच्या टिप्स त्यांनी स्पर्धा परीक्षार्थ्यांना दिल्या. विक्रम आकरे यांनी, स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू करण्यापूर्वी स्वतःमधील कमतरता व बलस्थानांचा शोध घेण्याचे सांगितले. जाहिरात प्रसिद्ध होण्याची प्रतीक्षा करीत बसण्यापेक्षा उपलब्ध वेळेचा सदुपयोग करून परिपूर्ण अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. अद्ययावत माहितीसाठी तंत्रज्ञानाचा आधार घेण्याचा सल्ला त्यांनी दिला. पोलीस भरतीमध्ये शारीरिक क्षमता चाचणीत अधिकाधिक गुण मिळविण्यासाठी पूर्वतयारी आवश्यक असल्याचे भरत सूर्यवंशी म्हणाले. धावणे, गोळा फेकताना शारीरिक गती कमीजास्त करण्याचे कसब सरावातून प्राप्त होत असल्याचे त्यांनी सांगितले. स्वयम् संस्थेचे अध्यक्ष विशाल मुत्तेमवार यांच्या संकल्पनेतून ही ऑनलाईन मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. कार्यशाळेत मोठ्या संख्येने राज्यभरातून युवक-युवती सहभागी झाले होते. राहुल खळतकर यांनी संचालन करून आभार मानले. कार्यशाळेच्या आयोजनासाठी किशोर वाघमारे, जीवन आंबुडारे, विजेंद्र पायदलवार, सिद्धार्थ सोनारे, मोहन गवळी, पायल भेंडे, कल्याणी मुनघाटे यांनी सहकार्य केले.