
नागपूर : कळमना पोलिसांनी अवैध शस्त्रांविरोधात मोठी कारवाई करत दोन युवकांना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून एक धारदार तलवार आणि दोन स्टीलचे चाकू जप्त करण्यात आले असून जप्त शस्त्रांची एकूण किंमत सुमारे ६ हजार ६०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
१४ जून रोजी कळमना पोलीस ठाण्याचे तपास पथक परिसरातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांची पडताळणी करत असताना एका विश्वासार्ह खबऱ्याकडून गुलमोहर नगर परिसरात अवैध शस्त्रे साठवून ठेवल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने छापा टाकला.
या कारवाईत कुणाल मोहन बंजारे (१९) याच्या घरातून सुमारे ५ हजार रुपये किमतीची स्टीलची धारदार तलवार जप्त करण्यात आली. चौकशीदरम्यान त्याने ही तलवार तरुण उर्फ शिवम शत्रुघ्न वर्मा (२३) याच्याकडून विकत घेतल्याची कबुली दिली.
त्यानंतर पोलिसांनी शिवम वर्माच्या घरावर धाड टाकून दोन चिनी बनावटीचे धारदार स्टीलचे चाकू जप्त केले. या चाकूंची किंमत सुमारे १ हजार ६०० रुपये असल्याचे सांगण्यात आले.
पोलिसांच्या मते, खबऱ्याकडून मिळालेल्या अचूक माहितीमुळे ही कारवाई यशस्वी ठरली. जप्त शस्त्रांचा वापर कोणत्या उद्देशाने केला जाणार होता, याचा तपास सुरू असून या प्रकरणामागे अन्य गुन्हेगारी संबंध आहेत का, याचाही शोध घेतला जात आहे.
दोन्ही आरोपींविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. शहरातील अवैध शस्त्रधारकांविरोधातील मोहीम यापुढेही अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.




