
नागपूर : कळमना पोलिसांच्या डीबी पथकाने घरफोडीच्या गुन्ह्याचा अवघ्या काही दिवसांत छडा लावत आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून चोरीस गेलेले सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ६ लाख ११ हजार रुपयांचा शंभर टक्के मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २ जुलै २०२६ रोजी लोकनाथ छोटेलाल यादव (वय ६२, रा. जानकी नगर, मिनी माता नगर, कळमना) यांनी त्यांच्या घरात चोरी झाल्याची तक्रार कळमना पोलीस ठाण्यात दाखल केली होती. या प्रकरणी गुन्हा क्रमांक ६१०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०५(अ) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता.
गुन्ह्याचा तपास करताना डीबी पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने पाहणी केली. तसेच विश्वसनीय माहितीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सापळा रचून गौरव सचिन पालीवाल (वय १९, रा. मिनी माता नगर, जानकी नगर गार्डनजवळ, कळमना) याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याच्याकडून चोरीस गेलेले सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ६ लाख ११ हजार रुपयांचा संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या कारवाईमुळे घरफोडीचा गुन्हा पूर्णपणे उघडकीस आला असून कळमना पोलिसांच्या डीबी पथकाच्या तत्पर तपासामुळे फिर्यादीला शंभर टक्के मुद्देमाल परत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पुढील तपास कळमना पोलीस करीत आहेत.




