Published On : Wed, Nov 20th, 2019

कामगार प्रतिनिधींना सूचना न देताच कामावरून काढले — शिवम् फूडस् प्रशासनाचा हेकेखोरीपणा

नागपूर: उमरेड रोडवरील बहादुरा भागातील शिवम् फूड्समधील ३ कामागारांना कुठलीही सूचना न देता अचानक कामावरून काढण्यात आले आहे. कंपनी प्रशासनाच्या या कामगारविरोधी धोरणाचा निषेध म्हणून स्थानिक कामगारांनी बुधवारपासून बेमुदत आंदोलन उभारले आहे.

प्राप्त माहितीनुसार विजय ढोबळे, ज्ञानेश्वर मिरे आणि अमोल उकुंडे अशी कामावरून काढण्यात आलेल्या कामगार प्रतिनिधींची नावे आहेत. शिवम् फूडमध्ये पारले बिस्किट तयार केली जातात. कंपनीचे मालक के. डी. अग्रवाल आणि संबंधित कामगारांमध्ये कार्यप्रणालीविषयी काही महिन्यांपूर्वीच करार झाला होता; मात्र कंपनी व्यवस्थापनाकडून तो करार पाळण्यात आला नसल्याचा आरोप आंदोलनकत्र्या कामगारांनी केला आहे.

कंपनी व्यवस्थापनाकडून विनाकारण केली जाणारी वेतनकपात, कर्मचाऱ्याचे बेकायदेशीर निलंबन आदी घटनांमुळे कामगारांमध्ये रोष आहे. याशिवाय कंपनीतील सध्याच्या कामगारांना सुनियोजितपणे काढून टाकत त्याजागी परप्रांतीय कामगारांना भरती करण्याचा कंपनीचा डाव असल्याचे कामगार म्हणाले.

याबाबत स्थानिक कामगार संघटनेकडून स्थानिक कामगार आयुक्तांना निवेदनही देण्यात आले होते; परंतु, कामगार आयुक्त कार्यालय प्रशासन आणि शिवम फूड्सचे मालक अग्रवाल यांचे साडेलोटे असल्याने कुठलीही कारवाई झाली नसल्याचा आरोप, निलंबित कामगारांनी ‘नागपूर टूडे’ प्रतिनिधीशी बोलताना केला.

यासंदर्भात कंपनीचे मालक के. डी. अग्रवाल यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

कंपनीने निलंबित कामगारांना कामावर परत न घेतल्यास आंदोलन आणखी तीव्र केले जाईल, असा इशारा आंदोलनकर्त्या कामगारांनी दिला आहे.