Published On : Fri, Mar 30th, 2018

नागपुरातील पत्रकाराच्या आई व मुलीचे हत्याकांड नरबळीच

Rashi and Usha Kamble Murder

नागपूर : हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बहुचर्चित दुहेरी हत्याकांडातील मृत दीड वर्षीय चिमुकली राशी आणि तिची आजी उषा कांबळे या दोघींची हत्या नरबळीचा प्रकार असल्याची चक्रावून टाकणारी माहिती पुढे आली आहे. तसे पुरावे पोलिसांच्या हाती लागल्याने या हत्याकांडाला चमत्कारिक कलाटणी मिळाली आहे. यासंबंधाने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी बोलण्याचे टाळले आहे. मात्र, विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, आरोपींच्या घरातून पोलिसांनी राशीचे रक्तरंजित कपडे, पूजेसाठी वापरण्यात आलेला लाल कपडा आणि हळदी-कुंकूसह अन्य साहित्य जप्त केले. त्यामुळे राशी आणि उषा कांबळेंची हत्या नरबळीचाच प्रकार असल्याचा दावा संबंधित सूत्रांनी केला आहे.

दीड वर्षीय राशी रविकांत कांबळे आणि उषा सेवकदास कांबळे (वय ५४) या दोघींची १७ फेब्रुवारीला गळा कापून हत्या करण्यात आली होती. गणेश शाहू आणि त्याच्या नातेवाईक आरोपींनी दोघींचेही मृतदेह पोत्यात कोंबून विहीरगावजवळच्या नाल्यात फेकले होते. या हत्याकांडाने सर्वत्र खळबळ उडाली होती. पोलिसांनी दुसऱ्या दिवशी मुख्य आरोपी गणेश शाहू आणि त्याची पत्नी गुडिया यांना अटक केली तर, त्याच्या एका १७ वर्षीय नातेवाईकाला ताब्यात घेतले होते. यानंतर तब्बल महिनाभराने गणेशचा भाऊ अंकित शाहू याला अटक करण्यात आली. सध्या तो पोलीस कस्टडीत तर अन्य आरोपी न्यायालयीन कस्टडीत आहेत. पोलिसांनी आरोपीच्या घरातून रक्ताने माखलेले कपडे, काही चीजवस्तू आणि खिडकीचे पडदे जप्त केले होते. मात्र, राशी आणि उषा कांबळे यांचे दागिने पोलिसांना सापडत नव्हते. दुसरे म्हणजे, आरोपीही याबाबत माहिती देत नव्हते.

या प्रकरणाचा तपास प्रारंभी सहायक पोलीस आयुक्त किशोर सुपारे यांच्याकडे होता. मात्र, त्यांनी प्रारंभीपासूनच संशयास्पद भूमिका वठविल्यामुळे त्यांच्याकडून पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी तपास काढून घेतला. हा तपास आता सहायक आयुक्त राजरत्न बनसोड करीत आहेत. सुपारे यांनी या प्रकरणात तीनच आरोपी असल्याचा दावा केला होता. मात्र, हत्याकांडात आरोपी अंकित शाहूचाही सहभाग असल्याचे पुरावे मिळाल्याने पोलिसांनी त्यालाही अटक केली. त्याच्या अटकेनंतर आरोपींनी पूजाघरात लपवून ठेवलेले उषा कांबळे यांचे दागिने मिळाले.

यावेळी पोलिसांनी पुन्हा कसून झडती घेतली असता चिमुकल्या राशीचे रक्ताने माखलेले कपडे त्यावर करण्यात आलेली पूजा, हळदी, कुंकू आणि अन्य साहित्यही पोलिसांना आढळले. विशेष म्हणजे, राशीच्या गळ्यातील जिवती आणि कानातील बाळ्या पोलिसांना अद्यापही हाती लागल्या नाहीत. पूजेनंतर त्याची आरोपींनी विल्हेवाट लावल्याचा संशय आहे. ज्यावेळी या दोघींचे मृतदेह पोलिसांना मिळाले, त्यावेळी दोघींचेही हात हळदी लावल्यासारखे पिवळे होते. या संबंधाने अधिक माहिती मिळवण्यासाठी तपास अधिकारी राजरत्न बनसोड यांच्याशी संपर्क साधला. मात्र, त्यांनी याबाबत आता बोलणे योग्य होणार नाही, असे म्हटले. मात्र, राशी आणि उषा कांबळे यांचे हात हळद लावल्यासारखे पिवळे होते, या माहितीला त्यांनी दुजोरा दिला.

राशी पायाळू होती
पायाळू व्यक्तीचा बळी दिल्यास मोठी धनप्राप्ती आणि सुखवैभव मिळते, असा गैरसमज जादूटोण्यावर विश्वास ठेवणारी, तंत्रमंत्र करणारी तसेच अंधश्रद्ध मंडळी बाळगतात. अशा अघोरींकडून निरागस पायाळू बालकांचे बळी देण्यात आल्याची अनेक प्रकरणे आहेत. चिमुकली राशी पायाळू होती, असे तिचे वडील रविकांत कांबळे सांगतात. विशेष म्हणजे, नरबळीची पूजा करणारी ही मंडळी ज्याचा कुणाचा बळी देतात, त्याचा ते गळा कापतात. इकडे तिकडे रक्त शिंपडतात. राशीचाही आरोपींनी गळा कापलेला आहे. अमावस्या, पोर्णिमा किंवा तीन दिवसाच्या अलीकडचा-पलीकडचा दिवस नरबळीसाठी आरोपी निवडतात. १५ फेब्रुवारीला अमावस्या होती, हा मुद्दा पुन्हा या प्रकरणाला जोड देणारा आहे.