Published On : Tue, Feb 18th, 2020

पत्रकारांनी केंद्रीय सूक्ष्म लघु मध्यम उद्योग मंत्रालयाच्या उद्योग स्नेही योजनांची माहिती सामान्य जनतेपर्यंत पोहोचवावी

नागपूर: पत्रकारांनी केंद्रीय ,लघु ,मध्यम उद्योग मंत्रालयाच्या उद्योग स्नेही योजनांची व धोरणांची माहिती सामान्य जनतेपर्यंत पोहोचवावी. यामुळे गडचिरोलीतील मागास भागातील युवक यांच्यात स्वयंरोजगार तसेच उद्यमशीलता यासंदर्भात जिज्ञासा व आवड निर्माण होईल, असे मत सुक्ष्म,लघू व मध्यम उद्योग विकास संस्था नागपूरचे संचालक पी.एम. पार्लेवार यांनी आज गडचिरोलीत व्यक्त केल. केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयांतर्गत कार्यरत नागपूर येथील पत्र सूचना कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालय गडचिरोली यांच्‍या सहकार्याने आज स्थानिक हॉटेल वैभव गडचिरोली येथे प्रसारमाध्‍यम कार्यशाळा – ‘वार्तालाप’चे उद्‌घाटन त्यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते.

निती आयोगाने आकांक्षित जिल्हा म्हणून गडचिरोलीची निवड केली असून कौशल्य विकास, उद्यमशीलता विकास यासोबतच सामायीक सुविधा केंद्र अशा केंद्रीय समाज मध्यम उद्योग मंत्रालयातर्फे गडचिरोलीमध्ये राबवण्यात येणार असल्याची माहिती पी.एम. पार्लेवार यानी यावेळी दिली. आरमोरी तालुक्यात तांदुळाचे क्लस्टर तसेच गडचिरोलीच्या इतर भागात अगरबत्ती क्लस्टर सुद्धा निर्माण होत आहे , असे त्यांनी सांगितल. एक यशस्वी उद्योजक म्हणून सुद्‌धा युवकांनी करीअरकडे बघावे, असे आवाहन त्यांनी केले.

उद्‌घाटकीय सत्रानंतर झालेल्या पहिल्या तांत्रिक सत्रामध्ये, ‘आदिवासी भागांमध्ये ग्रामीण उद्योगांचे महत्व’ या विषयावर जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी सी. कोहाडे यांनी मार्गदर्शन केले. खादी ग्रामद्योग आणि ‘मेकिंग गडचिरोली या पुढाकाराअंतर्गत सुमारे तीनशे महिलांनी अगरबत्ती क्लस्टरसाठी आपल्या कार्यालयात अर्ज केला असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

गडचिरोली मध्ये आयुर्वेदिक औषधी वनस्पती मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. या वनस्पतीवर प्रक्रिया करून त्यांचे वैद्यकीय व इतर क्षेत्रात क्लस्टर निर्माण करण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील युवकांनी पुढाकार घ्यावा, असे मत गडचिरोली जिल्ह्यातील अश्याच प्रकारच्या एक हर्बल उत्पादनाच्या क्लस्टरचे विकास संयोजक गणेश ठावरे यांनी यावेळी दिली.

प्रसारमाध्यमांनी समाज जीवनात घडणाऱ्या सकल घटना समाजापुढे अशा घटनांच्या दोन्ही बाजू मांडून समाजमत घडवण्यात भूमिका बजवावी, असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार हेमंत डोर्लीकर यांनी ‘ग्रामीण क्षेत्रात प्रभावी जनसंवादासाठी वृत्तपत्र व समाज माध्यमांची भूमिका ‘ या विषयावर बोलतांना केल.

शासकीय योजना केंद्र व राज्य स्तरावर तयार होतात . त्याची योग्यरित्या होणारी अंमलबजावणी, संभाव्य उणीवा यासंदर्भात पत्रकारांनी पाठपुरावा केल्याने अशा योजनाच्या प्रतिसाद कळतो. शासकीय योजनेच्या लाभार्थ्यांच्या यशकथा प्रसिद्ध केल्यास इतरानांही त्याची प्रेरणा मिळते, असे मत ‘विकास संवादामध्ये प्रत्रकारांची भूमिका ’ या विषयावर बोलतांना लोकमत दैनिकाचे जिल्हा प्रतिनिधी मनोज ताजने यांनी यावेळी मांडले.

नागपूर आकाशवाणी वृत्त विभागाचे सहायक संचालक डॉ. मनोज सोनोने यांनी ‘ग्रामीण क्षेत्रात प्रभावी जनसंवादासाठी इलेक्ट्रोनिक माध्यमांची भूमिका ’ यासंदर्भात मार्गदर्शन करतांना शासकीय यंत्रणा आणि प्रसारमाध्यम यात परस्पर प्रतिसाद संकलन झाल्यास लोकांना न्याय मिळू शकतो असे सांगितले.

शेवटच्या तांत्रिक सत्रामध्ये पत्र सूचना कार्यालय, नागपूरचे सहाय्यक संचालक श्री शशिन्‌ राय ‘विकास-संवाद आणि पत्र सूचना कार्यालय’ या विषयावर सादरीकरण केले.कार्यशाळेला गडचिरोली जिल्ह्यातील पत्रकार उपस्थित होते.