नागपूर: जयताळा प्रभाग क्रमांक ३८ मधील राजेंद्रनगर ते ग्रामदेवता मंदिराचा रस्ता रुंदीकरणाच्या संदर्भात आज (ता. ५) महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी व जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी संयुक्तपणे पाहणी केली. यासंदर्भात योग्य कारवाई करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले.
यावेळी नगररचना विभागाचे उपसंचालक श्री. किरण राऊत, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, सहायक आयुक्त श्री. सतीश चौधरी, कार्यकारी अभियंता श्री. रवींद्र बुंधाडे, नगर रचना सल्लागार श्री. प्रमोद गावंडे, उपअभियंता श्री. मंगेश गेडाम, उपअभियंता श्री. विवेक तेलरांधे उपस्थित होते.
जयताळा प्रभागातील राजेंद्रनगरातील मुख्य रस्त्याला लागून राज्य राखीव पोलीस दलाकडून (एसआरपीएफ) भिंत बांधली जात आहे. या भिंतीच्या बांधकामामुळे ग्रामदेवता मंदिर ते राजेंद्रनगर उद्यानापर्यंतचा रस्ता अरुंद होण्याची शक्यता आहे. भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पारेंद्र पटले यांनी मुख्यमंत्री माननीय श्री. देवेंद्र फडणवीस यांना यासंदर्भात निवेदन दिले होते. या भागातील जनतेच्या मागणीची दखल घेऊन मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांनी संयुक्तपणे भेट देऊन यासंदर्भात अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार सोमवारी मनपा आयुक्त व जिल्हाकाऱ्यांनी पाहणी केली. यावेळी श्री. पारेंद्र पटले उपस्थित होते.
एसआरपीएफची भिंत तयार झाल्यानंतर हा रस्ता अरुंद होण्याची शक्यता आहे. हिंगणा एमआयडीसी व मेट्रो स्टेशनकडे जाणारी वाहतूक या रस्त्यावरून होते. सध्या ९ मीटर रुंदीचा असलेला हा रस्ता १८ मीटर रुंदीचा करण्यात यावा तसेच एसआरपीएफची भिंत १५ फूट मागे करण्यात यावी, अशी मागणी निवेदनात केली आहे. अरुंद रस्त्यामुळे या भागात अपघाताचे प्रमाण वाढत असल्याने रस्त्याचे रुंदीकरण करण्याची आवश्यकता असल्याचे निवेदनात नमूद आहे. महापालिका आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी व जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी या भागाची संयुक्तपणे पाहणी केली. यावेळी लोकांच्या तसेच वाहतुकीमध्ये होणाऱ्या अडचणी समजून घेतल्या.