Published On : Wed, May 22nd, 2019

संयुक्त प्रयत्नातून करू नागपूरचा शाश्वत विकास : महापौर नंदा जिचकार

Advertisement

स्वयंसेवी संस्थांसोबत बैठक : हॅकॉथॉनमध्ये आलेल्या संकल्पनांवर करणार अंमल

नागपूर: ऑक्टोबर २०१८ मध्ये झालेल्या स्टार्ट अप फेस्टच्या माध्यमातून नवीन उद्योगांना बूस्ट देण्याचा प्रयत्न केला. हॅकॉथॉनच्या माध्यमातून शहर विकासासाठी नवीन संकल्पनांना आमंत्रित केले. आता या संकल्पनांवर अंमल करण्याची वेळ आहे. स्वयंसेवी संस्थांकडे तज्ज्ञ असतात. कौशल्य असते. अनुभव असतो. त्यामुळे स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने संयुक्त प्रयत्नातून नागपूरचा शाश्वत विकास घडवून आणू, असे आवाहन महापौर नंदा जिचकार यांनी केले.

‘शहर विकासात स्वयंसेवी संस्थांचा सहभाग’ ह्या संकल्पनेतून महापौर नंदा जिचकार यांनी स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींना आमंत्रित केले होते. मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृति स्थायी समिती सभागृहात आयोजित बैठकीला महापौर नंदा जिचकार यांच्यासह अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख, उपायुक्त राजेश मोहिते, स्थापत्य व प्रकल्प विशेष समितीचे सभापती संजय बंगाले, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, मेयर इनोव्हेशन कौन्सिलचे कन्वेनर प्रशांत कडू, महापौर इनोव्हेशन अवॉर्डचे मुख्य समन्वयक केतन मोहितकर, यांच्यासह शहरातील विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

पुढे बोलताना महापौर नंदा जिचकार म्हणाल्या, फेब्रुवारी महिन्यात आयोजित केलेल्या हॅकॉथॉनमध्ये तीन हजारांपेक्षा अधिक नावीन्यपूर्ण संकल्पना आल्या होत्या. परंतु त्यातील निवडक संकल्पनांना महापौर इनोव्हेशन अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. त्या संकल्पना आता प्रत्यक्षात आणण्यासाठी शहरातील स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य आवश्यक आहे. स्वयंसेवी संस्थांचा अनुभव, त्यांच्याकडे असलेले कौशल्य आणि तज्ज्ञ मंडळीच्या सहकार्याने शहरात शाश्वत विकास घडवायचा आहे. त्यासाठी आता सर्वांनी सोबत येऊन हा शिवधनुष्य उचलावा, असे आवाहन त्यांनी केले. आता दरवर्षी महापौर इनोव्हेशन अवॉर्ड आयोजित करण्यात येणार असून यापुढे त्यामाध्यमातून येणाऱ्या संकल्पनांचा उपयोग शहर विकासासाठी केला जाईल, असेही महापौर नंदा जिचकार यांनी यावेळी सांगितले.

टाटा ट्रस्टच्या सहकार्याने नागपूर महानगरपालिकाअंतर्गत असलेल्या नागरी आरोग्य केंद्राचा कायापालट करण्यात आला. त्यामुळे या आरोग्य केंद्राकडे नागरिकांचा कल वाढला आहे. या बदललेल्या नागरी आरोग्य केंद्रासंदर्भात सादरीकरण करण्यात आले..

तत्पूर्वी मेयर इनोव्हेशन कौन्सिलचे कन्वेनर डॉ. प्रशांत कडू आणि महापौर इनोव्हेशन अवॉर्डचे मुख्य समन्वयक केतन मोहितकर यांनी हॅकॉथॉन आणि महापौर इनोव्हेशन अवॉर्ड आयोजनाची चित्रफीत उपस्थितांना दाखविली. सुमारे ५० स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी बैठकीत सहभागी झाले होते. स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी शहर विकासात स्वयंसेवी संस्था काय-काय योगदान देऊ शकतात, महापौरांनी केलेल्या आवाहनानुसार शाश्वत विकासात कसा सहभाग घेऊ शकतात, याबाबत आपली मते मांडली. काही संकल्पनाही प्रतिनिधींनी महापौरांसमोर मांडल्या. महापौरांनी केलेल्या आवाहनानुसार शहर विकासात नक्कीच सहकार्य करु, असे आश्वासन प्रतिनिधींनी दिले.