नागपूर : खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दहेगाव रंगारी येथे सराफ व्यावसायिकावर गोळीबार करून सुमारे १२ लाख रुपयांचा ऐवज लुटल्याची धक्कादायक घटना गुरुवारी रात्री घडली. तिघा मुखवटा घातलेल्या आरोपींनी दुचाकीवरून येत ही लूट केली. व्यावसायिकाने प्रतिकार करताच आरोपींनी त्यांच्या पायात गोळी झाडली आणि डोक्यावर धारदार शस्त्राने वार करून सोने-चांदी व रोकड असलेली बॅग घेऊन पसार झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, वलनी बस्ती येथील मंगेश केशव मारोतकर यांचे दहेगाव रंगारी येथील सिद्धिकी कॉम्प्लेक्समध्ये ‘महालक्ष्मी ज्वेलर्स’ नावाचे सराफाचे दुकान आहे. गुरुवारी रात्री सुमारे ८ वाजता दुकान बंद करून ते दुचाकीने घरी जात असताना पिपळा-वलनी मार्गावरील धनगवळी बाबा मंदिराजवळ तिघा मुखवटाधारी आरोपींनी त्यांना अडवले. आरोपी काही अंतरापासून त्यांचा पाठलाग करत असल्याची माहिती समोर आली आहे.
आरोपींनी मारोतकर यांच्याकडील बॅग हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी विरोध करताच एका आरोपीने त्यांच्या पायात गोळी झाडली, तर दुसऱ्याने धारदार शस्त्राने डोक्यावर वार केला. त्यानंतर आरोपींनी बॅग घेऊन घटनास्थळावरून पलायन केले.
लुटलेल्या बॅगेत सुमारे १० लाख रुपयांची चांदी, दीड लाख रुपयांचे सोने आणि ३५ हजार रुपये रोख असल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमी मंगेश मारोतकर यांना स्थानिक नागरिकांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी नागपुरात हलविण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच खापरखेडा पोलीस, गुन्हे शाखेचे युनिट-६ तसेच वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळावरून गोळीचे एक रिकामे काडतूस जप्त केले असून पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनीही रात्री घटनास्थळाची पाहणी केली. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक पुरावे आणि इतर तपासाच्या आधारे तिन्ही आरोपींचा शोध सुरू आहे.





