Published On : Sat, Oct 27th, 2018

मनपाच्या जेसीबी ने पुन्हा तोडला फिडर

नागपुर: आज सकाळी ११. १५ वाजता महानगरपालिकेच्या जेसीबी (क्र. MH 49 AK 0014) ने गणेशपेठ फिडरला पोचवलेल्या नुकसानीमुळे जवळजवळ ४००० विद्युत ग्राहकांना नेमक्या सणासुदीच्या काळात विद्युत पुरवठ्याविना राहावे लागले. एसएनडीएलच्या चमूला एक तास विद्युत भाराचे व्यवस्थापन करण्यात शर्थीचे प्रयत्न करावे लागले त्या नंतर ३३केव्ही मॉडेल मिल उपकेंद्रातून विद्युतभार शिफ्ट करून परिस्थिती आटोक्यात आणण्यात यश मिळाले.

दरम्यान, सणांच्या काळात तसेच विद्युतभार अतिरिक्त असतो आणि अश्यात बेजबाबदार कार्यपद्धतीने एकूणच व्यवस्थेवर ताण येतो. या घटनेने एसटी स्टॅन्ड, गणेशपेठ आणि महाल या भागातील मोठा परिसर प्रभावित झाला.

मनपाच्या कंत्राटदाराचे नाव नायडू असे आहे. सध्या कंत्राटदार जॉईंट – तात्पुरती जोडणी लावून देणार आहे पण ग्राहकांची दीर्घकालीन सुविधा बघता एसएनडीएल ने मनपा अधिकार्यांना तो केबल बदलून देण्यास म्हंटले आहे. अश्या प्रकारे मागील वर्षभरात ३५ वेळा केबलचे नुकसान झाल्याने मनपा मुळे कंपनीला आत्तापर्यंत रु.१.३५ कोटींचे नुकसान झाले आहे. रु.१.३५ कोटींची नुकसान भरपाई किंवा केबल बदलून देणे या पैकी कुठल्याच पर्यायाला मनपाने उत्तर कळविले नाही. या बद्दल एसएनडीएलतर्फे वारंवार विचारणा करण्यात आली आहे.

सण हे केवळ ग्राहकांचेच नसतात तर ते सगळ्यांनी साजरे करण्यासाठी असतात. विद्युत कंपन्यांचे कर्मचारी देखील याचाच भाग आहेत जे कायम तत्पर राहून आपले कार्य बजावत असतात परंतु अश्या बेजबाबदार घटनांमुळे संबंधित एजंसीजला याची जाण नाही हे लक्षात येते. केवळ महापौर परिषद आयोजित करून कार्य सिद्धीस नेता आले असते तर त्यापेक्षा अधिक काय हवे होते! मागील महिन्यात माननीय सभापती महोदय यांनी सर्वाना खोदकामावर बंदी बाबत सांगितले होते परंतु आता त्याच्या अंमलबजावणी चे पुढे काय ?