
नागपूर : जरीपटका परिसरातील साई मंदिराजवळ पोलिसांनी कारवाई करत १०२ पोती संशयित तांदूळ जप्त केला आहे. एमएच-४९-बी-४२७९ क्रमांकाच्या मालवाहू वाहनातून ही तांदळाची खेप आढळून आली. हा तांदूळ रेशन दुकानांच्या साठ्याशी संबंधित आहे का, याचा तपास आता अन्न व औषध प्रशासनाकडून केला जाणार आहे.
जरीपटका पोलिसांनी मंगळवारी साई मंदिराजवळ संशयास्पद मालवाहू वाहन थांबवून त्याची तपासणी केली. वाहनामध्ये १०२ पोती तांदूळ आढळून आल्यानंतर पोलिसांनी वाहनासह तांदूळ ताब्यात घेतला. याबाबतची माहिती अन्न व औषध प्रशासनाला देण्यात आली आहे.
एफडीएच्या पथकाकडून तांदळाची गुणवत्ता, त्याचा स्रोत, बिल तसेच वाहतुकीशी संबंधित कागदपत्रांची तपासणी केली जाणार आहे. विशेषतः हा तांदूळ सार्वजनिक वितरण प्रणाली अर्थात पीडीएसच्या साठ्यातील आहे का, याची पडताळणी केली जाणार आहे.
दरम्यान, रेशन दुकानांमधून धान्य घेऊन ते राइस मिलमध्ये पाठवून प्रक्रियेनंतर खुल्या बाजारात विकले जात असल्याची चर्चा आहे. मात्र, या दाव्यांना अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. जप्त केलेला माल पाचपावली परिसरातील जैन नावाच्या व्यापाऱ्याशी संबंधित असल्याची चर्चाही असून, याबाबतही तपास सुरू आहे.
एफडीएच्या तपासणी अहवालानंतरच पुढील कायदेशीर कारवाई निश्चित केली जाणार आहे. त्यामुळे जप्त करण्यात आलेला तांदूळ सामान्य व्यापारी माल आहे की पीडीएस धान्याच्या कथित गैरवापराशी संबंधित आहे, हे अहवालानंतर स्पष्ट होणार आहे.




