Published On : Fri, Jul 19th, 2019

मॉर्निंग वॉक’साठी जपानी गार्डन विनामूल्य करा

Advertisement

नगरसेविका प्रगती पाटील यांचे वनराज्यमंत्री परिणय फुके यांना निवेदन

नागपूर, : सेमिनरी हिलच्या पायथ्याशी असलेले जपानी गार्डन हे परिसरातील नागरिकांसाठी ‘ऑक्सिजन केंद्र’ आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून तेथे सर्वच नागरिकांसाठी शुल्क आकारण्यात येत आहे. किमान नियमित ‘मॉर्निंग वॉक’ आणि ‘इव्हिनिंग वॉक’ करणाऱ्यांकडून शुल्क आकारण्यात येऊ नये, अशा आशयाचे निवेदन प्रभाग क्र. १४ च्या नगरसेविका प्रगती पाटील यांनी राज्याचे वनराज्यमंत्री परिणय फुके यांना दिले.

निवेदनात नमूद केल्यानुसार, जपानी गार्डन हे वनविभागाअंतर्गत येते. पूर्वी या उद्यानात शुल्क आकारले जात नव्हते. या उद्यानात परिसरातील ज्येष्ठ नागरिकांसह अन्य नागरिकही मोठ्या प्रमाणात सकाळी आणि संध्याकाळी फिरण्यासाठी येतात. मात्र आता सरसकट सर्वच नागरिकांकडून शुल्क वसुली करण्यात येत असल्याने नागरिकांनी फिरायचे कोठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

नागपूर महानगरपालिका, नागपूर सुधार प्रन्यास आणि डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत येणाऱ्या महाराजबाग येथे सकाळी आणि संध्याकाळी फिरण्यासाठी येणाऱ्यांकडून शुल्क आकारले जात नाही. जपानी गार्डन येथेही सकाळी ९ पर्यंत आणि सायंकाळी ५ ते ७ या वेळेत फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांकडून शुल्क आकारण्यात येऊ नये. वनराज्यमंत्री म्हणून आपण या निर्णयात हस्तक्षेप करावा, अशी विनंतीवजा मागणी नगरसेविका प्रगती पाटील यांनी केली आहे.

नागरिकांची अडचण लक्षात घेऊन सोयीच्या दृष्टीने लवकरच सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन वनराज्यमंत्री परिणय फुके यांनी यावेळी दिले.