नागपूर: सर्वसामान्य माणसाचा विचार सरकार करणार नसेल, तर अशा सरकारची धुंदी जनताच उतरवते, असे स्पष्ट मत ९९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांनी संमेलनाच्या समारोपीय सोहळ्यात व्यक्त केले.
रेशीमबाग मैदानावरील पुरुषोत्तम दारव्हेकर रंगमंचावर हा सोहळा पार पडला. झाडीपट्टीतील आदिवासी आणि पालावर राहणाऱ्यांच्या व्यथा मांडताना ते म्हणाले, की झाडीपट्टी व इतर लोककलांसाठी काहीतरी करण्याचे माझे नियोजन आहे. ते नाट्य परिषदेच्या माध्यमातून करण्याचा आम्ही प्रयत्न करू; पण झाडीपट्टीसारखी समृद्ध रंगभूमी ज्या भागात आहेत, त्या भागातील लोकांच्या जमिनी पुनर्वसनात गेल्या. जंगलाच्या ठिकाणीच पुनर्वसन करण्याचा विचार सरकारने का केला नाही, सरकार कोणतेही असो, ते सामान्यांचा विचार करीत नसेल तर जनताच धुंदी उतरवते.
सहिष्णुतेच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या प्रत्युत्तरावरही गज्वी यांनी भाष्य केले. ते म्हणाले, ‘‘राजकीय लोकांना मी शत्रू मानत नाही. दोन दिवसांपूर्वी शहरी नक्षलवादाचा छोटा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावरून सहिष्णुतेची चर्चा सुरू झाली. देशात सहिष्णुता आहे, असे आपले म्हणणे असेल तर ती व्यवहारात उतरावी, एवढेच माझे आवाहन आहे.’’
सूत्रसंचालन अविनाश नारकर व ऐश्वर्या नारकर यांनी केले.
गिरीश गांधींनी टोचले कान
नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती शाखेने नियमावली लवचिक ठेवावी. कारण ज्या शहरात संमेलन होत असते, तेथील संस्कृती, गरजा, भावना वेगळ्या असतात. फार ताणून धरण्याची गरज नसते. स्थानिक आयोजकांच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत. नागपुरात २००७ मध्ये झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे आयोजन करताना महामंडळाने आमच्यावर काहीही लादले नव्हते, या शब्दांत संमेलनाचे कार्याध्यक्ष गिरीश गांधी यांनी मध्यवर्ती शाखेचे कान टोचले.
ठराव न मांडण्याची परंपरा कायम
मुलुंड येथील ९८व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनापासून सुरू झालेली ठराव न मांडण्याची परंपरा नागपुरातही कायम राहिली. ठराव मांडून त्याचे काहीच होत नाही, असे सांगत पदाधिकाऱ्यांनी यंदाही हात वर केले.
नाटक हे माणसाच्या जगण्याचे प्रतिबिंब – केंद्रे
‘नाटक ही अडगळ नसून जीवन समृद्ध करणारी कला आहे, नाटक हे मानवी जगण्याचे प्रतिबिंब आहे,’’ असे प्रतिपादन नवी दिल्लीतील ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’चे संचालक वामन केंद्रे यांनी केले. ९९व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनातील ‘नाटक : जगण्याची समृद्ध अडचण’ या परिसंवादात ते बोलत होते.
‘‘गर्दी खेचणाऱ्या व्यावसायिक नाटकांपेक्षा जेव्हा हौशी नाटक मोठे होईल, तेव्हा नाटकाला चांगले दिवस येतील. मराठी माणसाने नाटकाला संकुचित केले आहे,’’ असेही मत वामन केंद्रे यांनी व्यक्त केले. परिसंवादाचे अध्यक्ष शफाअत खान होते. परिसंवादात अतुल पेठे, विभावरी देशपांडे आणि आशुतोष पोद्दार यांचाही सहभाग होता. कलेतून आलेले शहाणपण राज्यव्यवस्थेला धोक्याचे वाटते, म्हणूनच सेन्सॉर बोर्डाची कात्री व्यवस्थेला गरजेची वाटते. मात्र राजकीय आणि सामाजिक भान असलेले नाटक महत्त्वाचे आहे, असे मत अतुल पेठे यांनी व्यक्त केले. इतर कुठल्याही शास्त्राप्रमाणेच नाटक हेदेखील एक शास्त्र आणि कला आहे. त्याकडे चळवळ म्हणून बघू नये, नाटक ही सतत चालणारी प्रक्रिया आहे, असे प्रतिपादन नाटककार आशुतोष पोद्दार यांनी केले. सव्वा तास चाललेल्या या परिसंवादाच्या वेळी सुरेश भट सभागृह खच्चून भरलेले होते. परिसंवाद म्हटले की मोजके श्रोते, हे समीकरण नागपूरच्या श्रोत्यांनी चुकीचे ठरवल्याचे परिसंवादाचे अध्यक्ष शफाअत खान म्हणाले.

