नागपूर: ऑरेंज सिटीत थंडीचा जोर वाढत असतानाच क्रिकेटप्रेमींमध्येही उत्साह शिगेला पोहोचू लागला आहे. यंदाच्या वर्षातील पहिल्या आंतरराष्ट्रीय टी20 मालिकेची सुरुवात 21 जानेवारीपासून होत असून भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला सामना नागपूरच्या जामठा येथील विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या (VCA) जागतिक दर्जाच्या स्टेडियममध्ये रंगणार आहे. सुमारे 45 हजार प्रेक्षक क्षमतेच्या या मैदानावर पुन्हा एकदा ‘इंडिया-इंडिया’च्या घोषणांचा गजर होणार आहे.
वनडे वर्ल्डकपपूर्वी होणाऱ्या पाच सामन्यांच्या या टी20 मालिकेत भारत आणि न्यूझीलंडमधील धडाकेबाज खेळाडू आपली सर्वोत्तम कामगिरी दाखवण्याच्या प्रयत्नात असतील. टी20 वर्ल्डकपच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवण्यासाठी खेळाडूंमध्ये चुरस पाहायला मिळणार असून चौकार-षटकारांची आतषबाजी निश्चित आहे.
हायस्कोअरिंग जामठा पिचवर रंगणार संघर्ष
फलंदाजांना अनुकूल मानल्या जाणाऱ्या जामठा पिचवर मोठ्या धावसंख्येचे सामने पाहायला मिळतात. एकीकडे फलंदाज आक्रमक खेळ करताना दिसतील, तर दुसरीकडे वेगवान व फिरकी गोलंदाज आपल्या कौशल्याने त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतील. विदर्भातील क्रिकेटप्रेमींसाठी हा सामना एखाद्या सणासारखा असून 21 जानेवारीची ते आतुरतेने वाट पाहत आहेत.
जामठ्यात भारत अपराजेय
जामठा स्टेडियमवरील टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांचा इतिहास पाहिला तर भारतीय संघाचा वरचष्मा स्पष्ट दिसतो. आतापर्यंत येथे खेळलेल्या तीनही टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांत भारताने विजय मिळवला आहे.
29 जानेवारी 2017 रोजी इंग्लंडविरुद्ध भारताने 5 धावांनी थरारक विजय मिळवला होता. 10 नोव्हेंबर 2019 रोजी बांगलादेशला 30 धावांनी पराभूत केले. तर 22 सप्टेंबर 2022 रोजी ऑस्ट्रेलियावर 6 विकेट्सने मात करत भारताने आपले वर्चस्व कायम राखले.
VCAच्या यजमानपदाखाली होणारा हा नागपूरचा 14वा टी20 आंतरराष्ट्रीय सामना ठरणार असून त्यामुळे शहराच्या क्रिकेट इतिहासात आणखी एक सुवर्णपान जोडले जाणार आहे.
फॅक्ट फाईल-
भारताने येथे खेळलेले टी20 सामने: 5
भारताचे विजय: 3
अखेरचा टी20 सामना: 2022
जामठ्यातील आंतरराष्ट्रीय टी20 सामने: 13
स्टेडियमची क्षमता: 45,000 प्रेक्षक
रोहित-कोहलीची उणीव जाणवणार-
या सामन्यात नागपूरच्या क्रिकेटप्रेमींना रोहित शर्मा आणि विराट कोहली यांची अनुपस्थिती खटकणार आहे. 2024 टी20 वर्ल्डकपनंतर दोन्ही दिग्गजांनी टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. मागील वेळी, 23 सप्टेंबर 2022 रोजी जामठ्यातील सामन्यात रोहितने अवघ्या 20 चेंडूंमध्ये 46 धावांची नाबाद खेळी करत भारताला विजय मिळवून दिला होता, तर विराट कोहलीनेही आकर्षक फटकेबाजी केली होती. यंदा मात्र चाहते आपल्या लाडक्या खेळाडूंना मैदानावर पाहू शकणार नाहीत.
15 मार्च 2016 रोजी न्यूझीलंडने भारताला 47 धावांनी पराभूत करत जामठ्यात ऐतिहासिक विजय नोंदवला होता. कमी धावसंख्येच्या त्या सामन्यात कीवी फिरकीपटूंनी भारतीय फलंदाजांना अडचणीत आणले होते. मात्र एकूण टी20 आकडेवारी पाहता जामठा मैदानावर भारताचे पारडे जड आहे. इतिहास, सध्याची कामगिरी आणि चाहत्यांचा उत्साह या साऱ्यांच्या जोरावर भारत-न्यूझीलंड यांच्यातील हा सामना प्रचंड रोमांचक ठरण्याची चिन्हे आहेत.









