Published On : Mon, Aug 12th, 2019

स्वातंत्र्यसैनिक रतनचंद जैन यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान

कामठी: भारत छोडो आंदोलन, गोवा मुक्तिसंग्राम आणि हैद्राबाद मुक्तिसंग्रामात मोलाचे योगदान देणाऱ्या महाराष्ट्रातील ८ स्वातंत्र्य सैनिकांचा राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.९ ऑगस्ट या क्रांतिदिनाचे औचित्य साधून ‘भारत छोडो’ आंदोलन, ‘गोवा मुक्तिसंग्राम’, ‘हैद्राबाद मुक्तिसंग्राम’ यासोबतच देशभरात ब्रिटीशांना पिटाळून लावण्यासाठी झालेल्या विविध आंदोलनात सहभागी स्वातंत्र्य सैनिकांचा राष्ट्रपती भवनात सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील ८ स्वातंत्र्य सैनिकांना गौरविण्यात आले. उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू, लोकसभा अध्यक्ष ओम बिरला, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.
या कार्यक्रमात सन्मानित करण्यात आलेल्या महाराष्ट्रातील स्वातंत्र्य सैनिकांमध्ये भंडारा जिल्ह्यातील भिवाजी अंबुले, नागपूर जिल्हयातील रतनचंद जैन, परभणी जिल्हयातील माधवराव कुलकर्णी, औरंगाबाद जिल्हयातील लक्ष्मण उखडे, बुलडाणा जिल्ह्यातील नारायण खेडकर, लातूर जिल्हातील शिवलींगप्पा इराप्पा उर्फ विरभद्रप्पा सिद्रामप्पा मंडगे, वर्धा जिल्हयातील गणेश बाजपेयी आणि बीड जिल्हयातील बन्सी जाधव यांचा समावेश आहे.परभणी येथील माधवराव कुलकर्णी (91 वर्ष) यांनी ‘छोडो भारत’ आणि ‘हैद्राबाद मुक्ती संग्रामात’ सक्रीय सहभाग घेतला. भूमिगत राहून निजाम सैन्या विरोधात त्यांनी व्यॉड शिबीरातील सैनिकांना मदत करून हैद्राबाद आंदोलनात सक्रीय सहभाग घेतला. मंठा पोलीस स्थानकावर 6 जानेवारी 1948 ला करण्यात आलेल्या हल्ल्यात त्यांनी सक्रीय सहभाग घेतला. बुलडाणा येथील नारायण खेडकर (91 वर्षे) यांनी गोवामुक्ती संग्रामात सहभाग घेतला. यवतमाळ येथे होमिओपॅथीचे पदवी शिक्षण घेत असताना ते गोवा विमोचन समितीमध्ये सहभागी झाले व या समितीचे सचिव म्हणून त्यांनी काम पाहिले. बुलडाणा जिल्ह्यातून त्यांनी गोवा मुक्तीसंग्रामासाठी लोकांना एकत्रित केले. स्वातंत्र्य सैनिकांना घेवून बेळगाव मार्गे गोव्यात प्रवेश करताना त्यांना अटक झाली. श्री. खेडकर यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही सहभाग घेतला.

औरंगाबाद येथील लक्ष्मण उघडे (90 वर्षे) यांनी हैद्राबाद मुक्ती संग्रामात सक्रीय सहभाग घेतला. मुळचे औरंगाबाद जिल्हयातील वैजापूर तालुक्यातील डागपिंपळगाव येथील श्री. उघडे यांनी भूमीगत राहून हैद्राबाद मुक्ती संग्रामात सहभाग घेतला. निजामांचे वर्चस्व असलेल्या या भागातील 8 ते 10 खेडयांमध्ये श्री. उघडे यांनी तिरंगे झेंडे फडकवून निषेद दर्शविला.

लातूर जिल्हातील शिवलींगप्पा इराप्पा उर्फ विरभद्रप्पा सिद्रामप्पा मंडगे(88 वर्षे) यांनी वयाच्या 17 व्या वर्षी हैद्राबाद मुक्ती संग्रामात उडी घेतली. भूमीगत राहून त्यांनी दारुगोळा पुरवठा केला. त्यांना गुलबर्गा येथे अटक झाली यावेळी त्यांनी 2 महिने तुरुंगवास भोगला.

वर्धा येथील गणेश बाजपेयी (87 वर्षे ) यांनी गोवा मुक्ती संग्रामात सक्रीय सहभाग घेतला. वर्धा येथील जे.एस. वाणीज्य महाविद्यालयात पदवी शिक्षण घेत असताना ते गोवा विमोचन समितीत सहभागी झाले. पुणे-बेळगाव बांधा मार्गे ते सहकारी स्वातंत्र्य सैनिकांसोबत गोव्यात शिरले. यावेळी पोर्तुगीज सैन्यानी अटक करून त्यांना मारहान केली. त्यांना 2 महिन्याचा कारावास झ्राला.

बीड येथील बन्सी जाधव (86 वर्षे) यांनी 1947 सालच्या छोडो भारत आंदोलनात सक्रीय सहभाग घेतला. या काळात त्यांच्यावर लाठी हल्ला झाला व त्यांनी तुरुंगवासही भोगला.

भंडारा येथील भिवाजी अंबुले(94वर्षे), तुमसर येथील लोकमान्य टिळक विद्यालयात शिक्षण घेत असताना ‘छोडो भारत आंदोलनात’ सहभाग घेतला. याकाळात त्यांनी 10 महिने तुरुंगवास भोगला.

नागपूर जिल्ह्यातील कामठी येथील रतनचंद जैन (93 वर्षे) यांनी 1942 च्या भारत छोडो आंदोलनात सहभाग घेतला. यावेळी त्यांना 6 महिन्यांचा तुरुंगवास झाला.

दरम्यान, महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त समीर सहाय यांनी आज भारत छोडोआंदोलन’, ‘गोवा मुक्ती संग्राम’ आणि ‘हैद्राबाद मुक्तिसंग्रामात’ मोलाचे योगदान देणाऱ्या महाराष्ट्रातील 8 स्वातंत्र्य सैनिकांचा शाल व श्रीफळ देवून सत्कार केला. सहायक निवासी आयुक्त सुमन चंद्रा यांच्यासह वरिष्ठ अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

– संदीप कांबळे,कामठी