Published On : Sun, Oct 8th, 2017

जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनचे कार्य प्रेरणादायी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनने (जिओ) आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यासपीठ निर्माण केले असून, त्यांचे कार्य इतरांसाठी प्रेरणादायी आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिओ संस्थेचे कौतुक केले.

सायन येथील षण्मुखानंद सभागृहात प. पु. गुरु श्री नयनपद्मसागर यांच्या हस्ते जिओच्या सदस्यांना शपथ देण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी श्री.फडणवीस बोलत होते. ते पुढे म्हणाले, आपली संस्कृती ही पाश्चिमात्य संस्कृतीपेक्षा वेगळी आहे. आपल्या संस्कृतीत निसर्गातील लहानातील लहान जीवाला सुद्धा जगण्याचा अधिकार देते. त्याला जगविण्यासाठी मदत करते. म्हणूनच आपली संस्कृती ही सर्वश्रेष्‍ठ आहे. जिओ संस्थेमार्फत धार्मिक कार्याबरोबरच राष्ट्रीय कार्यही उत्तम प्रकारे केले जात आहे.

ही संस्था संकटकाळात नेहमीच पुढे येऊन मदत करते ही निश्चितच कौतुकास्पद बाब आहे, असे सांगून श्री.फडणवीस यांनी प.पु.गुरु श्री नयनपद्मसागर महाराज यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले व संस्थेच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी जिओसंस्थेच्या आंतरराष्ट्रीय मॅगझीनचे प्रकाशनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.

यावेळी आमदार सर्वश्री राज पुरोहित, मंगलप्रभात लोढा, आशिष शेलार, नरेंद्र मेहता, राजेंद्र पाटणी, यु.एस.राष्ट्रपती पदाचे उमेदवार रॉबीवेल्स आदिसह जिओ संस्थेचे पदाधिकारी, देशविदेशातील सदस्य उपस्थित होते.