Published On : Sun, Oct 8th, 2017

‘जागतिक शांती केंद्रा’करिता शासन जमीन उपलब्ध करून देणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : मांगी तुंगी येथे भगवान वृषभदेव यांच्या 108 फूट विशाल मूर्तीची स्थापना तसेच तेथील भागातील विकास करण्यासाठी शासनाने सहकार्य केले आहे. आता दुसऱ्या टप्प्यासाठीही शासन सहकार्य करेल. जैन समाजाला मुंबईत जागतिक स्तरावरील शांती केंद्र स्थापन करायचे असल्याने या केंद्राकरिता मुंबईत जागा निश्चित करून ती या केंद्राकरिता देण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

श्री ज्ञानमती माताजी यांच्या 66 वा त्याग दिवस तसेच 84 व्या जन्मजयंती दिन महोत्सवाकरिता आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. मांगी तुंगी येथील भगवान वृषभदेव यांच्या विशाल मूर्तींमुळे देशाला जागतिक किर्ती मिळाली असून, याचे श्रेय श्री ज्ञानमती माताजी यांचे आहे. माताजी यांनी समाजाप्रती त्याग केला असून, त्यांना मिळालेल्या तेजापोटी त्यांनी 400 ग्रंथाची निर्मिती केली. या ग्रंथामुळे आपले जीवन सार्थक होण्यास मदत होते. जैन समाजाने जगाला नेहमीच द्यायला शिकविले आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘वृषभदेव चरित्र’ या हिंदी अनुवादित ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. या महोत्सवास आमदार मंगलप्रभात लोढा, आमदार राज पुरोहित, आमदार राजेंद्र पाटनी, रवींद्र कीर्ती स्वामी, आर.के.जैन, संजय बोरा, सुरेश जैन, मूर्ती समितीचे अनिल जैन तसेच जैन समाज मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.