परिवहन समिती सभापती नरेंद्र (बाल्या) बोरकर यांची ग्वाही : बस ऑपरेटरशी केली सविस्तर चर्चा
नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या परिवहन विभागाच्या बस चालक व वाहकांवर अन्याय होणार नाही, त्यांच्या सर्व समस्या सोडविण्यावर भर देणार असल्याची ग्वाही परिवहन समिती सभापती नरेंद्र (बाल्या)बोरकर यांनी दिली.
सोमवारी (ता.30) मनपा मुख्यालयात बस ऑपरेटर आणि कर्मचारी संघाचे प्रतिनिधी यांच्याशी सविस्तर चर्चा सभापती नरेंद्र बोरकर यांनी केली.
या बैठकीला उपायुक्त तथा परिवहन व्यवस्थापक राजेश मोहिते, परिवहन विभागाचे श्रम अधिकारी अरूण पिपरूडे, प्रशासकीय अधिकारी रवींद्र पागे, यांत्रिकी अभियंता योगेश लुंगे, लेखा अधिकारी विनय भारव्दाज सुकीर सोनटक्के प्रामुख्याने उपस्थित होते.
मनपा परिवहन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन कर्मचारी संघाने परिवहन समिती सभापती नरेंद्र (बाल्या) बोरकर यांच्याकडे दिले होते. त्या समस्या व प्रश्न सोडविण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली.
कर्मचाऱ्यांच्या मागणी समस्यांमध्ये चालक व वाहकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आगारात चौकशी कक्ष तयार करावा, पगारी एक दिवस साप्ताहिक रजा, वार्षिक रजा कायद्याअंतर्गत कर्मचाऱ्यांना देण्यात याव्यात, पगार हा किमान वेतन कायदयानुसार देण्यात यावा, या मागण्या होत्या.
यापैकी साप्ताहिक एक दिवसाची पगारी रजा देण्याची मागणी सभापती नरेंद्र बोरकर यांनी मान्य केली. आठवड्यात कोणताही एक दिवस सुट्टी देण्यात यावी, त्याचे परिपत्रक आठ दिवसात मला सादर करावे, असे निर्देश सभापती बोरकर यांनी दिले.
वार्षिक रजा संदर्भात एक धोरण निश्चित करून पुढील बैठकीत या विषयावर सांगण्यात येईल, असे नरेंद्र बोरकर यांनी सांगितले. विना तिकीट प्रवासी आढळला तर आता वाहकाला निलंबित करण्याचा अधिकार बस ऑपरेटरला नसणार आहे. विना तिकिट प्रवासी आढळला तर रवींद्र पागे, पिपरूडे यांच्या अध्यतेखाली चौकशी समिती नेमण्यात येईल, चौकशीअंती 15 दिवसाच्या आत प्रवासी भाड्याची रक्कम संबंधित वाहकांकडून वसुल करत त्याला परत कामावर घेतले जाईल, असेही नरेंद्र बोरकर यांनी सांगितले.
प्रारंभी कोणत्या ऑपरेटरकडे किती बसेस आहे. त्याचे वेळापत्रक कसे याचा संक्षिप्त आढावा सभापती नरेंद्र बोरकर यांनी बस ऑपरेटरमार्फत घेतला.
बैठकीला आर के सिटी बस सर्व्हिसेसचे निलमणी गुप्ता, हंसा सिटी बसचे श्री पारेख, ट्रॅव्हल टाईम्सचे सदानंद काळकर, युनिटी सेक्युरिटीचे शेखर आदमने, एसआयएसचे संजयकुमार सिंग, डिम्स कंपनीचे सूर्यकांत अंबाडीकर उपस्थित होते.